राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शिक्षकेतर गुणगौरव पुरस्कार २०२५’ ने धनाजी पाटील सन्मानित

गारीवडे (प्रतिनिधी): गगनबावडा तालुक्यातील बावेली येथील श्रीराम हायस्कूलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेले धनाजी गुंडू पाटील (डी. जी.) यांना निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने अत्यंत प्रतिष्ठित “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शिक्षकेतर गुणगौरव पुरस्कार २०२५” देऊन सन्मानित करण्यात आले आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण व उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला असून, त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे. पाटील यांनी शिक्षण आणि समाजासाठी केलेल्या समर्पित कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत आणि इतरांनाही प्रेरणा मिळाली आहे. त्यांचा हा गौरव शाळेसह संपूर्ण गगनबावडा तालुक्याच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील सेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गोपाळपूर येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी.पी. रोगे होते. या प्रसंगी प्रसाद गायकवाड, सुजित जगताप, विद्या माळशेकर, श्रीमती रणशूर, एम.एस. इकबाल, सिद्धया स्वामी यांसारखे अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्याचे खुमासदार सूत्रसंचालन नाझिया शेख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर लेंडवे यांनी मानले. धनाजी पाटील (डी. जी.) यांच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल श्रीराम हायस्कूलच्या सर्व शिक्षकवर्गासह बावेली व गगनबावडा तालुक्यातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून, त्यांच्या या प्रवासात लाभलेली सर्वांची मोलाची साथ महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी नमूद केले.




