महाराष्ट्र ग्रामीण

तिळवणीच्या वादग्रस्त ग्रामसेविका सुजाता कांबळे यांची अखेर मजले येथे बदली!

हातकणंगले : (प्रतिनिधी): हातकणंगले तालुक्यातील तिळवणी येथील वादग्रस्त ग्रामसेविका सुजाता कुमार कांबळे यांची अखेर बदली मजले (ता. हातकणंगले) येथे करण्यात आली आहे. गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने हा बदलीचा आदेश काढला आहे. पुढील आदेश येईपर्यंत कांबळे मजले येथे कार्यरत राहतील, तर तिळवणी येथील अतिरिक्त कार्यभार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे (ग्रामसेवक, अतिग्रे) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
ग्रामसेविका सुजाता कांबळे यांच्याविरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. सरपंच राजेश बाबासाहेब पाटील यांनी ७५० चौरस फुटांचा (स्क्वे. फुटांचा) प्लॉट त्यांच्या घरगड्याच्या नावावर केला. या बेकायदेशीर कामात ग्रामसेविका कांबळे यांनी मदत केल्याचा गायकवाड यांचा मुख्य आरोप होता.
या अन्यायाविरुद्ध गायकवाड कुटुंबीय गेल्या दोन वर्षांपासून उपोषणे आणि विविध आंदोलने करत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कार्तिकेयन एस. यांच्याकडे न्यायाची मागणी करत होते. सीईओ यांनी वारंवार दुर्लक्ष केल्याने, गायकवाड कुटुंबीयांनी त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करत, थेट त्यांच्या कार्यालयासमोर केक कापून तिसरा वर्धापन दिन साजरा केला होता. या अभिनव आंदोलनाची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती.
ग्रामसेविका कांबळे यांची बदली झाली असली तरी, या कारवाईवर गायकवाड यांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्यांनी ग्रामसेविकेच्या बडतर्फीची मागणी केली होती, मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केवळ बदलीसारखी जुजबी कारवाई करून ग्रामसेविकेला पाठीशी घातल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे.
यासोबतच, बेकायदेशीर ठरावाला पाठिंबा देणारे सरपंच राजेश पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी कायम ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button