महाराष्ट्र ग्रामीण

निपाणी-फोंडा मार्गाच्या कामात फक्त ‘वेळकाढूपणा’! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कबुली;

रिपब्लिकन पक्षाकडून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा

कागल / राधानगरी (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): निपाणी-फोंडा राज्यमार्गावरील गैबी तिट्टा (मांजर खिंड) ते राधानगरीपर्यंतच्या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या कामात केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) वरिष्ठ अधिकारी पिरजादे यांनी दिल्याचे समोर आले आहे.

गैबी तिट्टा ओलांडल्यावर दुधगंगा प्रकल्पाकडे (काळम्मावाडी धरण) जाणाऱ्या फाट्यावरही रस्त्यावर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य पाहायला मिळत आहे. त्यानंतर पुढे प्रवास करताना प्रत्येक मोठ्या वळणावर खड्डे असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. राधानगरीमध्ये प्रवेश करतानाही खड्डेच प्रवाशांचे स्वागत करतात. राधानगरी पोलीस स्टेशन आणि तहसीलदार कार्यालय यांसारखी महत्त्वाची कार्यालये मुख्य रस्त्यावर असतानाही रस्त्याची दुरवस्था कायम आहे. हा रस्ता राज्यमार्ग म्हणून ओळखणे ही अंधश्रद्धाच ठरू लागली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकारी शिष्टमंडळाने व्यक्त केली. या कार्यालयांच्या प्रमुखांनी संबंधित कंत्राटदार कंपनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारला नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम झाले होते, पण केलेले काम लगेच उखडले गेले. त्यामुळे ‘हे लोक फक्त काम करतोय हे दाखवतात का?’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करून अधिकारी आपली ‘टक्केवारी’ घेऊन सुस्त आहेत, असा थेट आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निकृष्ट कामासाठी ‘जितेंद्र सिंग कंपनी’ला कोर्टात खेचायला हवे होते, मात्र राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपर्यंत हे धाडस केले नाही, कारण त्यांना त्यांचा हप्ता वेळेवर मिळत गेला, असेही निवेदनात म्हटले आहे.

जितेंद्र सिंग कंपनीचा प्रोजेक्ट मॅनेजर वर्गीस नावाचा व्यक्ती रस्त्यावर कधीच दिसत नाही. कामाच्या दर्जाशी त्याला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. ‘हा माणूस काम कमी आणि माणसे मारायची हमी घेऊन बसला आहे का?’ असा संतापजनक प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि ‘जागृत मालक फाऊंडेशन’च्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकारी पिरजादे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी कामात सुधारणा न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. ‘जर कामे व्यवस्थित नाही झाली, तर न्यायालयात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत. वेळीच सावध व्हा, नाहीतर कोर्टाच्या पायऱ्या झिजवायला तयार राहा,’ असा थेट इशारा यावेळी देण्यात आला.

रस्त्यावरील खड्डे आणि अपघातांमुळे होणाऱ्या नुकसानीला सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदारच जबाबदार असल्याचा ठाम पवित्रा यावेळी पदाधिकाऱ्यांनी घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button