महाराष्ट्र ग्रामीण

दिवाळी व उरुसापूर्वी खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा इशारा!

कागल (सलीम शेख ) : येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या दिवाळी सण आणि गहिनीनाथ गैबीपीर उरुसापूर्वी कागल शहर आणि बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा नगरपरिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, दिवाळी आणि उरुसाच्या काळात शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा वाढते. मात्र, सध्या बसस्थानक परिसर, शहरातील विविध मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वाहनधारक आणि पादचारी यांना अपघात होण्याचा धोका वाढला असून छोटे-मोठे अपघात घडले आहेत.
विशेषतः, एन.एच.-४ महामार्गावरील दोन्ही बोगद्यांच्या आसपास मोठे खड्डे पडले असून, दररोज हजारो वाहने या मार्गावरून जातात. यामुळे येथील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. मुख्याधिकारी स्वतः या मार्गावरून ये-जा करत असतानाही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आगामी सण आणि उरुस लक्षात घेता, शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजविणे आवश्यक आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासह रस्ते दुरुस्तीबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास, नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदन देताना माजी उपनगराध्यक्ष संजय कदम, बाळू हेगडे, राजे बँकेचे संचालक दीपक मगर, अरुण गुरव, सुशांत कालेकर, सुर्यकांत कदम, प्रमोद सोनुले, गजानन माने, हिदायत नायकवडी, संतोष मिसाळ, सचिन निंबाळकर, चेतन भगले, पांडुरंग जाधव, संदीप पसारे, संदीप नेरले, प्रकाश वाघमारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button