महाराष्ट्र ग्रामीण

समाजात अवैध धंद्यांचा कहर! तरुणाई व्यसनाधीनतेच्या गर्तेत, पालक चिंतेत!

कागल(प्रतिनिधी : बाळसो कांबळे): आज समाजात अवैध धंद्यांनी अक्षरशः कहर केला असून, तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेच्या खाईत लोटली जात आहे. व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली एक गंभीर कीड बनली आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांचे भविष्य अंधारात जात आहे. विशेषतः आई-वडील आणि पालकवर्ग आपल्या मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ग्रासलेला आहे.

१९७०-८० च्या दशकातही व्यसनाधीनता होती, पण तिचे प्रमाण कमी होते. त्यावेळी घरात आणि गल्लीतील थोरामोठ्यांचा आदर होता. लोक व्यसन करत असले तरी ते मर्यादेत होते. तंबाखू, चुना, सिगारेट, बिडी, हातभट्टी, शिंदी आणि देशी दारू ही व्यसने उपलब्ध होती. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता ‘स्टार मावा’, गुटखा, ‘मानिकचंद’, ‘आर एम डी’, चरस, गांजा असे अनेक अंमली पदार्थ सर्रास उपलब्ध आहेत. आज गल्ली-बोळात बिअर बार, शॉपी, गांजा, मावा, हातभट्टी दारू, वाईन्स आणि गुटखा यांची खुलेआम विक्री होताना दिसत आहे. या नशेच्या वाढत्या प्रमाणामुळे थोरामोठ्यांचा आदर संपुष्टात आला आहे. शिक्षक किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींना कोणी घाबरत नाही. नशा आणि बेफिकिरीमुळे तरुण पिढी भरकटताना दिसत आहे.

कॉलेजमध्ये जाणारी मुले-मुली गुटखा, मावा आणि गांजाच्या आहारी गेली आहेत. आई-वडील शेतात राबून, कष्ट करून मुलांना शिक्षण देत आहेत. मात्र, कॉलेजमध्ये गेलेली ही मुले व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याचे विदारक चित्र आहे. अनेक विवाहित तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन अकाली मृत्यू पावले आहेत. त्यांच्या लहान मुलांचा आणि विधवा पत्नीचा विचारही त्यांनी केला नाही. आता या पत्नींपुढे मुलांना शिकवावे की आपल्या पोटाची खळगी भरावी, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. इतके अवैध धंदे सर्रास सुरू असतानाही पोलिसांना अवैध विक्री करणारे सापडत नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. अनेक ठिकाणी विक्री करणारे पकडले जातात, पण या अवैध धंद्यांच्या ‘मुळाशी’ पोलीस आणि न्यायव्यवस्था पोहोचत नाही. कारण विक्री करणाऱ्या ‘फांद्या’ दिसतात, पण या धंद्यांची निर्मिती करणारी ‘पाळेमुळे’ मात्र पोलिसांना सापडत नाहीत. लहान मुलेही ही विक्री करताना दिसत आहेत. यामुळे अवैध धंदे आता गावगाड्यापर्यंत पोहोचले आहेत.

नागरिकांमधून व्यक्त होत असलेल्या कुजबुजीनुसार, आजकालची तरुण पिढी रात्री-बेरात्री गावाबाहेर आडोसा पाहून गांजा ओढत असल्याचे बोलले जाते. अनेक तरुण मंडळे आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यांना याविरुद्ध निवेदनं देऊनही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे:

  • जागृतीचा अभाव: शाळांमधून व्यसनमुक्तीबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे.
  • बेरोजगारी: कौशल्य विकास योजना वाढवून बेरोजगारी कमी करणे महत्त्वाचे आहे.
  • प्रशासनाची कठोरता: पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, पण यात ते अयशस्वी ठरत आहेत.
  • राजकीय हस्तक्षेप: अवैध धंद्यांना मिळणारे राजकीय बळ त्वरित थांबवावे. अनेकदा आरोपी सापडल्यास राजकीय वजनाचा वापर करून मदतच केली जाते.
  • कौटुंबिक आधार: कुटुंबांनी मुलांशी संवाद साधणे, विश्वास देणे आणि त्यांना भावनिक आधार देणे गरजेचे आहे.
  • सकारात्मक उपक्रम: तरुणांना मनोरंजन, खेळ, कला अशा सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करावे.
  • निवडणुका: निवडणुकीत उमेदवारांकडून होणारी पैशांची उधळण, जेवणावळी आणि इतर पुरवठा हे देखील तरुणांना नशेकडे वळवण्याचे एक कारण आहे.

देशाचे भविष्य धोक्यात!

चहा-सिगारेटपासून नशेच्या आहारी जाण्याची सुरुवात होते. नशेमध्ये गुरफटलेली ही तरुण पिढी देशाचे भविष्य आहे. प्रशासन आणि कायद्याची जबाबदारी आहे की त्यांनी अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळाव्यात. जर आताच यावर आवाज उठवला नाही, तर अवैध धंद्यांचा कहर होऊन बहुजनांच्या पिढ्यानपिढ्या बरबाद होतील. आपली मुले कोणत्या मार्गाने चालली आहेत, हे पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. या अवैध धंद्यांना आता कोण आणि कधी आळा घालणार? हा गंभीर प्रश्न समाजासमोर उभा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button