जितेंद्र सिंग कंपनीची मुजोरी, अधिकारी आणि ठेकेदार यांची जनतेशी गद्दारी!

कागल (प्रतिनिधी – बाळासो कांबळे): निपाणी-फोंडा राज्य मार्गाच्या कामात ‘जितेंद्र सिंग कंपनी’ने केलेली मुजोरी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकारी व ठेकेदारांनी संगनमत करून जनतेची केलेली गद्दारी आता चव्हाट्यावर आली आहे. निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरणाचे उखडणे आणि अयोग्य लेवलमुळे तुंबणारी गटारे यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
सन २०१८ मध्ये मोठ्या धडाक्यात निपाणी-फोंडा राज्यमार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, कामाची पद्धत अत्यंत ढिसाळ असून ती ‘उंदरासारखी पळापळ’ करण्यासारखी आहे. कामाचा दर्जा तपासण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी नागरिक गेल्यास, कंपनीचा मॅनेजर ‘जितेंद्र सिंग’ कोणालाही भेटायला तयार नाही. ऐरे-गैरे, नुतु-खैरे लोकच भेटतात. त्यामुळे कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल जबाबदार व्यक्तीला प्रश्न विचारायचा कोणाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सिमेंट काँक्रिटीकरण निकृष्ट झाल्यामुळे रस्त्यावर आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे. वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडून निघत आहे. यावरून कंपनीने फक्त रस्त्याच्या नावाखाली उपद्याप केला असून, सार्वजनिक पैशाची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट होते.
राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त रस्त्यावर फेरी मारून जातात. ‘काम चांगले झाले की वाईट’, याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसल्याचे चित्र आहे. कारण स्पष्ट आहे – त्यांना त्यांचा पगार मिळतो आणि कंपनीकडून ‘दोन टक्के कमिशन’ मिळते. यामुळे जनतेचे वाटोळे झाले तरी त्यांना फरक पडत नाही. उलट, जनतेतून आवाज उठवल्यास अधिकारी कंपनीच्या बाजूने उत्तर देऊन त्यांची पाठराखण करतात. ‘पैसा जनतेचा, कसाही उधळा, कोणी विचारणार नाही’ अशी त्यांची धारणा झाली आहे. या रस्त्याच्या कामाचा सर्वात मोठा नमुना मुधाळ तिट्टा ते शिंदेवाडी दरम्यानच्या गटार बांधणीत दिसून येतो. रस्त्यावरचे पाणी गटारात जाण्यासाठीची लेवल (उंची) अत्यंत चुकीची आहे. Level एवढी ‘उत्तम’ आहे की पाणी गटारात जातच नाही आणि जे पाणी आत जाते ते तुंबून पुढे सरकत नाही. गटारांची लेवल अति उत्तम आणि रस्त्याची लेवल छान! परिणामी पाणी रस्त्यावरच साचून राहते, ज्यामुळे रस्त्याच्या नुकसानीत भर पडत आहे. गटारांवरील सिमेंटचे स्लॅब अनेक ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत आहेत. स्लॅबची जाडी कुठे २ इंच, कुठे ३ इंच तर कुठे ४ इंच आहे. सळी (सरिया/स्टील बार) टणक (मजबूत) आणि व्यवस्थित नाही. स्लॅबला पाणी मारले नसल्यामुळे ते टिकणार कसे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कंपनीचा व्यवस्थापकीय अधिकारी ‘वर्गीस’ नावाचा व्यक्ती सध्या कुठे आहे, याची कोणालाच माहिती नाही. रस्ता खराब आणि गटार खराब करून जनतेचे हाल करणाऱ्या या ‘जितेंद्र सिंग’ कंपनीला आणि त्यांना साथ देणाऱ्या PWD च्या अधिकाऱ्यांना ‘पुरस्काराने सन्मानित’ केले पाहिजे, अशी उपरोधिक जनभावना नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण कामाचा ‘पोलखोल’ आणि पाठपुरावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या ‘जागृत मालक फाउंडेशन’च्या वतीने सुरू आहे. जनतेचा पैसा वाया घालवणाऱ्या या गैरव्यवहारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.




