महाराष्ट्र ग्रामीण

संत बाळूमामा मंदिरासमोरील उड्डाणपुलाची दुरवस्था: ‘खड्ड्यांचे साम्राज्य’ वाहतुकीसाठी धोकादायक; PWD च्या भूमिकेवर संतप्त नागरिक!

कागल/आदमापूर (प्रतिनिधी बाळासो कांबळे ): श्री. क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरासमोर असलेला महत्त्वाचा उड्डाणपूल सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या साम्राज्यात रूपांतरित झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या या भयानक अवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पुलाच्या स्थितीमुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज लागत नाहीये. त्यामुळे अचानक ब्रेक लावणे किंवा दिशा बदलणे भाग पडत आहे, ज्यामुळे वारंवार अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे, ज्यामुळे नागरिकांची आर्थिक गैरसोय होत आहे. या उड्डाण पुलाचे बांधकाम झाल्यापासून आतापर्यंत केवळ तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्याचे काम सुरू आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्ता पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. निपाणी-फोंडा राज्य महामार्गावर नेहमीच वर्दळ असते, त्यामुळे रस्त्याची दुरावस्था अधिक गंभीर बनत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडून रस्ता खचत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांचा तीव्र रोष सार्वजनिक बांधकाम विभाग, कागल (PWD) यांच्यावर आहे. “या रस्त्याबाबत आमचे काही देणे-घेणे नाही,” अशा थाटात PWD विभाग वागत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. महामार्गावरील या महत्त्वाच्या पुलाकडे विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे जनतेचा संयम सुटत चालला आहे.

या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची कायमस्वरूपी सुधारणा करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांचा तोल सुटून मोठा अनर्थ घडण्यापूर्वी जबाबदार प्रशासकीय विभागाने समाधानकारक उपाययोजना करावी, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. सध्या या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक प्रशासनाला “शेलक्या शब्दांत” उद्धार करताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button