काळी दिवाळीचा इशारा! कोल्हापूरचे दिव्यांग खेळाडू निधीसाठी करणार ‘खर्डा-भाकर’ आंदोलन

कोल्हापूर (कोटा न्यूज नेटवर्कर): गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला शासकीय निधी न मिळाल्यामुळे कोल्हापूरमधील दिव्यांग खेळाडू आता तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मागणी पूर्ण न झाल्यास यंदाची दिवाळी ‘काळी दिवाळी’ म्हणून साजरी करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्या हक्कांसाठी हे खेळाडू २० ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘खर्डा-भाकर’ खाऊन तीव्र आंदोलन करणार आहेत. दिव्यांग सेना, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष उत्तम चौगुले आणि जिल्हा उपाध्यक्ष सुमित शिंदे यांनी या आंदोलनाची माहिती १० ऑक्टोबर २०२५ रोजीच जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे दिली होती. त्यांनी आपल्या मागणीत गेल्या तीन वर्षांपासून थांबलेला निधी तात्काळ मिळावा, जेणेकरून दिव्यांग खेळाडूंना न्याय मिळेल, असे स्पष्ट केले आहे.या पत्राची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलवली आहे. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होणारे हे तीव्र आंदोलन थांबवण्यासाठी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांच्या स्वाक्षरीने मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद कोल्हापूर), आयुक्त (कोल्हापूर महानगरपालिका), आणि जिल्हा क्रिडा अधिकारी (जिल्हा क्रिडा कार्यालय, कोल्हापूर) यांना आज, दिनांक १७/१०/२०२५ रोजी पत्र (क्र. कार्या-७ गृह २/आर आर/२१८८/२०२५) पाठवण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांनी आज, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी कार्यालयात पूर्वीचे सर्व पत्रव्यवहार, बैठकांचे इतिवृत्त आणि संघटना नोंदणी प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या सर्व कागदपत्रांची तसेच संबंधित विभागाकडील निधी प्रस्तावांची तातडीने फेरचौकशी करून, प्रलंबित निधीबाबत उचित निर्णय घ्यावा आणि दिव्यांग खेळाडूंना न्याय द्यावा, अशी स्पष्ट मागणी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व संबंधित विभागांना तात्काळ उचित कार्यवाही करून, संबंधित दिव्यांग खेळाडूंना ‘खर्डा-भाकर’ खाऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली आहे.
या गंभीर विषयावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर आणि सहआयुक्त नगरपालिका प्रशासन, कोल्हापूर यांनाही या पत्राची प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. प्रलंबित निधी न मिळाल्यास दिव्यांग खेळाडूंची यंदाची दिवाळी दु:खात जाण्याची भीती व्यक्त होत असून, आता प्रशासन यावर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




