‘मतदार यादीतील त्रुटी लोकशाहीसाठी धोकादायक’, राजे समरजित घाटगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार; तातडीने कार्यवाहीची मागणी

कोल्हापूर (सलीम शेख ) : लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि संविधानाच्या सार्वभौमत्वासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या मतदार यादीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने, कागल, गडहिंग्लज आणि उत्तुर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीवर राजे समरजित घाटगे यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मतदार यादीतील या समस्या सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं नमूद करत, राजे समरजित घाटगे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे सविस्तर निवेदन सादर केले.यावेळी त्यांनी प्रशासनाकडून लवकरात लवकर सदर प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य मतदारांना मिळावी आणि यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती कार्यवाही केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

निवेदनातील मुख्य आक्षेप खालीलप्रमाणे मतदान गायब कागल शहरातील प्रभाग क्र. १० मधील प्रारूप मतदार यादीमधील तब्बल ३४२ मतदान गायब झाले आहेत, हे मतदान नेमके कुठे गेले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.दुबार नोंदी कागल शहरामध्ये एकूण २८,४१३ मतदान असून, त्यापैकी पुरुष मतदार १३,८६४, स्त्री मतदार १४,५४८ आणि इतर १ मतदार आहेत. या एकूण मतदानापैकी ८२२ नावे दुबार मतदारयादीत का आहेत, याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण मागितले. मयत मतदारांची संख्या कागल शहरात सर्व प्रभागांमध्ये एकूण ४५८ मयत मतदार आहेत का? या आकडेवारीबद्दल सत्यता तपासण्याची मागणी त्यांनी केली.एकाच घरावर अनेक नोंदी आणि वाढ प्रभाग क्र. ९ मध्ये घर नं. १७१ वर तब्बल ३६ मतदारांची नोंद असल्याचे दिसून येते. ‘बीएलओ’ यांनी एकाच घरावर इतकी नावे कशी नोंद केली? तसेच, याच प्रभागातील बूथ क्र. ३४ व ३५ मध्ये एकूण १०६ मतदानवाढ झाल्याचे दिसत आहे, यामागचे कारण काय? प्रभागांच्या लोकसंख्येत तफावत: प्रभाग क्र. ११ हा ३ उमेदवारांचा असून त्याचे मतदान २,३८८ आहे, तर प्रभाग क्र. ९ हा २ उमेदवारांचा असताना त्याचे मतदान ३,७९२ इतके आहे. प्रभागाच्या लोकसंख्येत इतकी मोठी तफावत का, असा मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला.एकाच व्यक्तीच्या अनेक नोंदी व ओळखपत्र: प्रभाग क्र. २ मध्ये मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये पान नं. १२४ मध्ये अ. क्र. २४९५, २४९८, २५०० आणि २५०३ या चार अनुक्रमांकांवर एकाच व्यक्तीचे नाव मतदारयादीमध्ये आहे. व्यक्ती एकच असताना त्याचे मतदान ओळखपत्र क्र. वेगवेगळे कसे आहेत, असा गंभीर सवालही त्यांनी केला.
लोकशाही प्रक्रियेतील या मूलभूत त्रुटी तातडीने दूर कराव्यात, अन्यथा यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन लोकशाही प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास उडू शकतो, अशी भीती राजे समरजित घाटगे यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे,अशी मागणी करण्यात आली.



