शाहूवाडीत बिबट्याचा क्रूर हल्ला: परळीनिनाई येथे वृद्ध दांपत्य ठार; परिसरात भीतीचे वातावरण!

कोल्हापूर(विशेष प्रतिनिधी): शाहूवाडी तालुक्यातील परळीनिनाई (Parali Ninai) परिसरात शनिवारी रात्री उशिरा बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्यात एका वृद्ध दांपत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. निनू यशवंत कंक (वय ७५) आणि रखुबाई निनू कंक (वय ७०) अशी या हल्ल्यात ठार झालेल्या दुर्दैवी दांपत्यांची नावे आहेत. गोलीवणे धनगरवाडा येथील रहिवासी असलेल्या या दांपत्याचा मृत्यू वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे झाल्याने संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.
कंक दांपत्य हे रोजच्याप्रमाणे आपल्या शेळ्या चरण्यासाठी परळीनिनाई धरणाच्या बॅकवॉटर (Backwater) परिसरात घेऊन गेले होते. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान, रविवारी (दि. २०) सकाळी रखुबाई कंक यांचा मृतदेह झाडीत छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला, तर निनू कंक यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. घटनास्थळावरील परिस्थिती आणि मृतदेहांच्या जखमा पाहता, हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस आणि वनविभागाने वर्तवला आहे. वन्यप्राण्याने मृतदेहाचे काही भाग खाल्ल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे हल्ल्याची तीव्रता स्पष्ट होते. तसेच, या दांपत्यासोबत असलेल्या शेळ्यांचाही अद्याप पत्ता लागलेला नाही.
घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवले. वनविभाग नेमका कोणत्या वन्यप्राण्याने हा हल्ला केला याची खात्री करण्यासाठी अधिक तपास करत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ही करुण घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि मृत दांपत्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे. या घटनेमुळे शाहूवाडी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली जात आहे.




