महाराष्ट्र ग्रामीण

तीन वर्षांपासून निधी प्रलंबित: दिव्यांग खेळाडूंचा ‘न्याय मागणी’ एल्गार; पुणे आयुक्तालयावर आंदोलनाचा इशारा!

कोल्हापूर (सलीम शेख ) : गेली तीन वर्षे प्रलंबित असलेला दिव्यांग खेळाडूंचा निधी त्वरित वर्ग न झाल्यास, दिव्यांग सेना, कोल्हापूर या संघटनेने दिव्यांग कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयासमोर १३ नोव्हेंबर २०२५ रोजी “न्याय मागणी आंदोलन” करण्याचा इशारा दिला आहे.
या मागणीसाठी २० ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘दिव्यांगांची काळी दिवाळी! ३ वर्षापासून प्रलंबित दिव्यांग खेळाडू निधीसाठी ‘खर्डा-भाकर’ आंदोलन’ करण्यात आले होते. या आंदोलनाची जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस प्रशासनाने योग्य मध्यस्थीची भूमिका निभावली. त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तात्काळ खेळाडू निधी वर्ग करण्याचे आदेश दिले, तसेच जिल्हा क्रीडा विभागाने सहकार्य करण्याचे लेखी आश्वासन दिले.
मात्र, जिल्हा परिषद कोल्हापूरकडील समाज कल्याण अधिकारी यांनी आंदोलनास उशिरा भेट दिली आणि खेळाडू निधीबाबत कोणतेही आश्वासन किंवा चर्चा केली नाही, त्याबद्दल दिव्यांग सेनेने जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
‘कागदपत्राचा खेळ’:
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे आणि क्रीडा व युवक सेवा संचलनालय, पुणे या दोन्ही आयुक्तालयांचा निधी वर्ग करण्याचा स्पष्ट आदेश असूनही, निधीसाठी सुनावणी लावली जाईल, मग निर्णय घेतला जाईल आणि अभ्यास केला जाईल असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी कधीही सुनावणी घेण्यात आलेली नाही, तरीही जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून पुन्हा ‘कागदपत्राचा खेळ’ केला जात असल्याचा आरोप उत्तम चौगुले (जिल्हाध्यक्ष, दिव्यांग सेना) यांनी केला आहे.
प्रशासनाने शासन निर्णय, संघटनेचे पत्रव्यवहार, बैठकांचे इतिवृत्त आणि नोंदणी प्रमाणपत्रे यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अशी विनंती ‘दिव्यांग सेना’ने केली आहे. १३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निधी वर्ग न झाल्यास, पुणे येथे ‘न्याय मागणी आंदोलन’ सुरू होईल, याची सर्व प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा दिव्यांग सेना, कोल्हापूर ने दिला आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कोल्हापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे यांसह संबंधित विभागांना माहिती व पुढील कार्यवाहीकरिता पाठवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button