कोल्हापुरात ‘लोकशाही व संविधान सन्मान मोर्चा’; लाखोंच्या संख्येने नागरिक सहभागी होणार!

कोल्हापूर (सलीम शेख): : देशाच्या सद्यःस्थितीमध्ये न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य धोक्यात आणण्याचे प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संविधानाच्या आणि भारतीय लोकशाहीच्या सन्मानार्थ कोल्हापूर येथे ‘लोकशाही व संविधान सन्मान मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७ ऑक्टोबर २०२५ रोजी बिंदू चौक तेथून जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे या महामोर्च्याची सुरुवात होणार आहे.
हा महामोर्चा केंद्र आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेचा आवाज बनणार असून, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांना पुष्टी देणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.
हा मोर्चा बिंदू चौकातून निघून , शिवाजी चौक मार्गे, दसरा चौक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. तेथे पदाधिकारी व नागरिकांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, केंद्र व राज्य सरकार, प्रशासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.
अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना, विविध विचारधारेचे नागरिक, साहित्यिक, पत्रकार, वकील आणि बुद्धीवादी या मोर्च्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. यामध्ये अंगमेहनती कडील चळवळीतील पक्ष व संघटना, माकप, भाकप, आरपीआय (आठवले गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन मुक्ती पार्टीसह विविध पक्षांचा समावेश आहे.
या महामोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) यांनी कोल्हापूर शहरातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार लोकशाहीप्रेमी नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या मोर्च्याच्या माध्यमातून देशातील लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानाचा सन्मान करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




