‘चेन स्नॅचर’ जेरबंद! ₹९०,००० किमतीची सोन्याची चेन जप्त; कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

कोल्हापूर (सलीम शेख) : महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत गजाआड केले असून त्याच्याकडून एकूण ₹९०,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रिटा अमरलाल वाधवा (वय ४२, रा. गांधीनगर,) या महिला दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करून परत घरी जात असताना गांधीनगर येथील पठाण डॉक्टर यांच्या दवाखान्यासमोरून पाठीमागून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
सदर गंभीर गुन्हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लोकवस्तीमध्ये घडल्याने, पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला प्राधान्य दिले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पीएसआय जालिंदर जाधव, संतोष गळवे व पथकातील अन्य अंमलदार यांच्या मदतीने तपास सुरू केला.
गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असताना पोलीस अंमलदार राजू कोरे आणि गजानन गुरव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे केंद्रीय प्राथमिक शाळेसमोर सापळा रचून आरोपी रितेश रविंद्र कंगणे (वय ३६, रा. शाहूनगर, हुपरी,) याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला आरोपीने गुन्हा नाकारला, परंतु पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर त्याने कबुली दिली. तपासादरम्यान त्याच्याकडून ६.६०० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि विवो कंपनीचा मोबाईल हँडसेट असा एकूण ₹९०,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी गांधीनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
ही यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पीएसआय जालिंदर जाधव, संतोष गळवे, पोलीस अंमलदार राजू कोरे, गजानन गुरव, वैभव पाटील, विशाल खराडे, अमित मर्दाने, महेश आंबी, अमित सर्जे, प्रदिप पाटील, संजय हुंबे, संतोष बरगे, सचिन जाधव, सतिश जंगम, सतिश सूर्यवंशी यांनी केली आहे.




