कोल्हापूरच्या मसाई पठारावरील ऐतिहासिक बौद्ध लेण्यांच्या ठिकाणी ‘पार्ट्यांचे अड्डे’; कोंबड्या कापून, दारू पिऊन विटंबना, महिलांच्या सुरक्षिततेला धोका!

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : पन्हाळाजवळ असलेले ऐतिहासिक महत्त्व असलेले आणि निसर्गरम्य मसाई पठार सध्या काही समाजकंटक आणि तळीरामांमुळे मोठ्या संकटात सापडले आहे. या पठारावर सापडलेल्या प्राचीन बौद्ध लेण्यांच्या आणि मसाई देवी मंदिराच्या पवित्र परिसरात खुलेआम कोंबड्या कापून, मद्यपान करून पार्ट्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ऐतिहासिक स्थळांची विटंबना होत असून, महिला व कुटुंबांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मसाई पठारावर आढळलेल्या बौद्ध लेण्यांचे संवर्धन शासनामार्फत सुरू आहे. वन विभागाने या ठिकाणी बॅरिकेड्स लावून आणि पायऱ्या बांधून सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, याच संधीचा फायदा घेऊन काही ‘अति उत्साही अंधभक्त’ आणि तळीराम दर रविवारी मोठ्या संख्येने येथे जमत आहेत. ते कोंबड्या कापून, दारू पिऊन पार्ट्या करतात आणि उरलेली घाण, खरकटे तसेच कोंबड्यांचे अवशेष तिथंच टाकून जातात. यामुळे संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, तसेच बौद्ध लेण्यांची आणि मसाई देवी मंदिराच्या परिसराची विटंबना होत आहे. या प्रकाराबद्दल स्थानिक लोक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, हे लोक श्रद्धेऐवजी अंधश्रद्धाच जास्त पसरवत आहेत. “लोक मसाई देवीजवळ स्वच्छ परिसर ठेवण्याऐवजी पूर्ण परिसर कोंबड्या कापून आणि खरकटे टाकून घाण करून जातात,” अशी खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
या गंभीर परिस्थितीबद्दल वन विभागाच्या चेक पोस्टला विचारणा केली असता, त्यांनी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हतबलता व्यक्त केली. “मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही तरी काय करू? लोक अजिबात ऐकत नाहीत,” असे उत्तर त्यांनी दिले. वन विभागाने आणि साहेबांनी मिळून मागील नवरात्रीच्या वेळी शाळेची मुले आणून मसाई देवी मंदिराचा परिसर साफ करून घेतला होता, पण तरीही ही परिस्थिती सुधारलेली नाही. वन विभागाकडे गस्तीसाठी (राउंड गाडी) पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे तळीरामांचे धाडस वाढले असून, त्यांनी या परिसराला आपला हक्काचा अड्डा बनवला आहे.
कोल्हापूर परिसरातील अनेक महिला, लहान मुले, मुली आणि कुटुंबे मसाई पठारावर निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी येतात. मात्र, तळीरामांचे वाढलेले प्रमाण आणि त्यांच्या दारू पिऊन दंगा करण्याच्या सवयीमुळे महिलांना व कुटुंबांना आता दिवसा ढवळ्याही येथे येण्यासाठी भीती वाटू लागली आहे. सध्या व्यसनामुळे वाढलेली गुन्हेगारी पाहता, या बेजबाबदार आणि निष्ठुर तळीरामांच्या नादी कोण लागणार म्हणून स्थानिक लोकही त्यांना काही बोलत नाहीत, ज्यामुळे त्यांचे धाडस अधिक वाढले आहे. या सर्व घटनांचा आढावा घेऊन महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिरगावकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मसाई पठार हे ऐतिहासिक आणि हजारो लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या अशा ठिकाणी ही कृत्ये होणे अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. अशा नालायक तळीरामांचा बंदोबस्त लवकरत लवकर करण्यात यावा आणि त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महिला सन्मान परिषदेच्या प्राजक्त कांबळे, सीमा कांबळे, दीपाली रुईकर, पूजा मस्के आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
प्रियाताई शिरगावकर यांच्या मागणीनंतर वन विभागाकडून “जेवढी जास्त प्रमाणात होईल तेवढी कारवाई करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत,” असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता, ऐतिहासिक वारसा आणि महिलांची सुरक्षितता जपण्यासाठी प्रशासनाने तात्काळ मनुष्यबळ वाढवून कडक गस्त सुरू करावी आणि मसाई पठाराचे पावित्र्य जपावे, अशी मागणी जोर धरत आहे.




