वन्यप्राण्यांच्या नुकसानीवर तातडीने मदत करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे वन विभागाला निर्देश!

कोल्हापूर (सलीम शेख ): वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि योग्य भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे, असे स्पष्ट निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. सर्किट हाऊस येथे वन विभाग आणि आजरा तालुक्यातील वनक्षेत्रातील गावांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, त्यासंदर्भात मिळणाऱ्या नुकसानभरपाई प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, तसेच जंगल क्षेत्रातून रस्ता निर्माण करण्यासंबंधीच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आजरा तालुक्यातील हत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
पालकमंत्री आबिटकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले की, पंचनामे वेळेत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी. केवळ एकदाच पंचनामा न करता, वास्तविक नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. तसेच, एकाच भागात वारंवार प्राणी येऊन नुकसान होत असल्यास, त्या संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई निश्चित करावी.
शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आणि त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर, वनहक्क दावे आणि पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी वन विभागाला दिल्या.




