महाराष्ट्र ग्रामीण

सीपीआर रुग्णालयाला अत्याधुनिकतेचा ‘आधारवड’; एमआरआय, सिटीस्कॅन, मॉड्युलर ओटीचे लोकार्पण!

कोल्हापूर (सलीम शेख ) : गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) सर्वोपचार रुग्णालयात आता अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन, मॅमोग्राफी आणि अल्ट्रा सोनोग्राफी यांसारख्या आधुनिक तपासणी सुविधांचे लोकार्पण नुकतेच पार पडले.
या महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर, सीपीआरमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे लोकार्पण आणि शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीमधील अत्याधुनिक ऑडिटोरियमचे उद्घाटन देखील यावेळी संपन्न झाले.
कोल्हापूर जिल्ह्यासह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो रुग्ण उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल होत असतात. आता या रुग्णांना विविध वैद्यकीय तपासण्यांसाठी खासगी रुग्णालयात किंवा केंद्रांवर धावपळ करावी लागणार नाही.
या सर्व तपासण्या रुग्णालयात अत्यल्प खर्चात उपलब्ध झाल्यामुळे गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना, महायुती सरकार भविष्यातही राज्यातील गोरगरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे वैद्यकीय क्षेत्रात एक वेगळी आणि स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच, सीपीआरमधील ३०० कोटी रुपये खर्चाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
यावेळी माजी नगरसेवक आदिल फरास, अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण मिरजे यांच्यासह सीपीआर रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीपीआरमधील या नवीन सुविधांमुळे हजारो रुग्णांना फायदा होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button