महाराष्ट्र ग्रामीण

कोल्हापुरात अग्निशमन विभागाच्या नूतन इमारतीचा स्लॅब कोसळला; एका मजुराचा मृत्यू, काही जखमी!

फुलेवाडी (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील फुलेवाडी येथील महानगरपालिकेच्या (मनपा) अग्निशमन विभागाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असताना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत स्लॅबखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत होती. तातडीने स्थानिक नागरिक व प्रशासनाने मदतकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतीला सुरुवात केली. मात्र, ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी ठरली असून, ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या मजुरांपैकी एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर काही मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गंभीर दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात आले असून, प्रशासनाने ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद केले आहे. तसेच, या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या दोषींवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button