६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कोल्हापुरात भव्य ‘परिवर्तन महामानवंदना महारॅली’ संपन्न!

प्रतिनिधी (बाळासो कांबळे): विज्ञानवादी धम्माचा स्वीकार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार करण्याचा संदेश देत, ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त बौद्ध समाजातर्फे गुरुवारी, २ ऑक्टोबर २०२५ रोजी, पेठ वडगाव ते सन्मानभूमी माणगाव या मार्गावर भव्य ‘परिवर्तन महामानवंदना महारॅली’ उत्साहात संपन्न झाली. परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजय दशमी दिनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. याच ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून आणि आंबेडकरांना सामूहिक अभिवादन करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.
पेठ वडगावहून निघालेल्या या मोटर सायकल बाईक रॅलीला सांगली फाटा, शिरोली येथे अभिवादन करण्यासाठी बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पांढरी वस्त्रे परिधान केली होती, ज्यामुळे एक अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायक दृश्य निर्माण झाले होते. उपस्थितांच्या हातात पंचशील ध्वज आणि गळ्यात पंचशील मफलेर होते, तसेच निळे झेंडे घेऊन त्यांनी महामानवाला वंदन केले.
यावेळी रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या वतीने परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक रित्या अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव मा. सतीश माळगे (दादा), हातकणंगलेचे आमदार मा. अशोक माने (बापू), शिरोली एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. मा. सुनील गायकवाड साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी महामानवाला आदराने वंदन केले. ही भव्य रॅली समविचारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते (कोल्हापूर जिल्हा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या परिवर्तन महामानवंदना महारॅलीमुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक उत्साहाचे आणि प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले होते.




