कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तक्रार निवारणासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत!

कोल्हापूर (सलीम शेख) : राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्राप्त झालेल्या एका गंभीर तक्रारीच्या अनुषंगाने महाविद्यालय प्रशासनाने तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. ही कारवाई ‘स्वयंघोषित दिव्यांग प्रमाणपत्र’ प्राप्त झाल्याबाबतच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे.
शिवसेना उपनेता व जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सादर केलेल्या पत्राच्या आधारे ही चौकशी समिती नेमण्यात आली असून, महाविद्यालयाने दि. १९ ऑक्टोबर रोजी अधिकृत आदेश जारी केला आहे.
समितीचे सदस्य व कार्यक्षेत्र:
– अध्यक्ष: डॉ. किशोर मिरमुडे, सहयोगी प्राध्यापक, बालरोगचिकित्साशास्त्र विभाग
– सदस्य सचिव: डॉ. भूषण मिरजे, वैद्यकीय अधिक्षक
– सदस्य: डॉ. सतीश देसाई, सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग
या समितीला तक्रारीची सखोल शहानिशा करून मूळ कागदपत्रांसह परिपूर्ण अहवाल दि. २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही समितीस देण्यात आले आहेत.
तक्रारदार संजय पवार (उबाठा शिवसेना उपनेते) यांनी चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे समितीस सादर करावीत, तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. भूषण मिरजे यांनी आपल्या विभागाशी संबंधित कागदपत्रे त्वरित समितीस उपलब्ध करून द्यावीत, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
ही कारवाई महाविद्यालयाच्या पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाची दिशा दर्शवते, अशी प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.




