शासकीय योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वावलंबी बनावे – सतीश माळगे यांचे आवाहन!

प्रतिनिधी : (बाळासो कांबळे) – महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या विविध बेरोजगार तरुणांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊन त्यांनी स्वावलंबी बनावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कोल्हापूरचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी केले. रिपब्लिकन पक्षाच्या ६८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून काल, दि. ०३/१०/२०२५ रोजी अंकुश कानडेकर यांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्यात आली. त्यांना शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेतून ३५% अनुदानित कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. याच कर्जाच्या सहाय्याने राजारामपुरी, कोल्हापूर येथे सुरू करण्यात आलेल्या ‘हॉटेल कृष्णाई’ चे उद्घाटन सतीश माळगे यांच्या हस्ते करण्यात आले.
सतीश माळगे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शासन अनेक योजनांमार्फत होतकरू बेरोजगार तरुणांना अनुदानित तसेच कमी व्याजदरामध्ये व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करते. CMEGP सारख्या योजनांमध्ये तरुणांना त्यांच्या प्रकल्पाच्या स्वरूपानुसार उत्पादन उद्योगासाठी ₹५० लाखांपर्यंत आणि सेवा उद्योगासाठी ₹२० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. राखीव प्रवर्गातील तरुणांना ३५% पर्यंत अनुदान (सबसिडी) मिळते, ज्यामुळे कर्जाचा मोठा हिस्सा शासनामार्फत भरला जातो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने जिल्ह्यामध्ये अनेक तरुणांना शासनाच्या योजनांमार्फत कर्ज मिळवून देऊन त्यांना व्यवसायात उभे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्घाटनानंतर बोलताना सतीश माळगे (दादा) यांनी बेरोजगार तरुणांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनले पाहिजे, यावर जोर दिला. नोकरीच्या मागे न लागता, उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत आणि इतरांना रोजगार द्यावा, असे महत्त्वपूर्ण मत त्यांनी व्यक्त केले.
अंकुश कानडेकर यांना हे संपूर्ण कर्ज उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य रिपब्लिकन पक्षाचे शहराचे नेते प्रवीण आजरेकर यांनी केले. यावेळी राधानगरीचे कुंडलिक कांबळे, संदीप कांबळे, सुरज रोकडे आणि प्रवीण आजरेकर यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



