मोठी कारवाई: गोवा बनावटीची दारू आणि रेनॉल्ट डस्टरसह रु. ७.५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; सांगलीच्या दोघांना अटक

कोल्हापूर (सलीम शेख ) : अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्याच्या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारी मोठी टोळी पकडली आहे. या कारवाईत दारू, रेनॉल्ट डस्टर गाडी आणि इतर साहित्यासह एकूण रु. ७,५१,८४०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तयार केलेल्या पथकाकडून जिल्ह्यात अवैद्य व्यवसायांवर सातत्याने कारवाई केली जात आहे. दि. ०४.१०.२०२५ रोजी LCB चे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस बंदी असलेली गोवा बनावटीची दारू घेऊन एक रेनॉल्ट डस्टर गाडी (क्र. एम. एच. १०-सी.ए.८२११) भोगावती मार्गे कोल्हापूरच्या दिशेने येत आहे.
या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला भोगावतीकडून येणाऱ्या रोडवर सापळा लावण्याचा आदेश दिला. पथकाने राधानगरी रोडवरील नवीन वाशीनाक्याजवळील ‘द स्पाइस हॉटेल’ समोर सापळा लावला आणि गाडी थांबवून तिची तपासणी केली असता, गाडीमध्ये मॅगडॉल्स नंबर १ आणि रॉयल स्टॅग व्हिस्की कंपनीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.
या कारवाईत रु. ५१,८४०/- किंमतीची गोवा बनावटीची दारू आणि रेनॉल्ट डस्टर गाडी असा एकूण रु. ७,५१,८४०/- किंमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे. तसेच, गाडीतील शुभम शिवकुमार साळुंखे (वय २८) आणि आशितोष हिंदुराव साळुंखे (वय २७), दोघे रा. जाधवनगर, आंधळी, ता. पलूस, जि. सांगली या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, प्रदीप पाटील, गजानन गुरव, वैभव पाटील, विजय इंगळे, शिवानंद स्वामी, संजय पडवळ यांनी यशस्वीपणे पार पाडली.




