महाराष्ट्र ग्रामीण

सर्वोच्च न्यायपालिकेवर ‘बूट हल्ला’: ही वैचारिक दिवाळखोरी आणि संविधानावरील घाव! – प्रियाताई शिरगावकर!

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी): देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर भर कोर्टरूममध्ये बूट फेकून मारण्याचा झालेला प्रयत्न हा केवळ एक सुरक्षा भंग किंवा गैरशिस्त नाही; तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आणि संविधानाच्या मूल्यांवर केलेला थेट हल्ला आहे. प्रियाताई शिरगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत यामागे दडलेल्या मनुवादी आणि असहिष्णू विचारसरणीवर कडक शब्दांत प्रहार केला आहे. “वैचारिक लढाईत पराभूत झाल्यानंतर वैयक्तिक चिखलफेक करण्याचा हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे,” असे मत प्रियाताई शिरगावकर यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणतात, “सध्या देशात अशी एक प्रवृत्ती कार्यरत आहे, जी आपल्यापेक्षा खालच्या जातीचा व्यक्ती उच्च पदावर विराजमान झालेला किंवा त्याला जास्त प्रसिद्धी मिळालेली सहन करू शकत नाही. वैचारिक आणि मुद्द्यांवर आधारित वादविवादात टिकाव लागत नाही म्हणून, सरळ त्या व्यक्तीवर वैयक्तिक चिखलफेक करणे, ही त्यांची सोयीस्कर कार्यपद्धती बनली आहे. न्यायमूर्ती गवई यांच्यावरील हा हल्ला त्याच हीन आणि संकुचित मानसिकतेचे घृणास्पद प्रदर्शन आहे.”

न्यायव्यवस्थेचा अपमान म्हणजे देशद्रोहाला प्रोत्साहन शिरगावकर यांनी या घटनेचे गांभीर्य स्पष्ट करताना म्हटले: कोर्टाचा गंभीर अवमान: “सत्र न्यायालयात शिस्तभंग केल्यास ‘कोर्टाचा अवमान’ (Contempt of Court) होतो, तर थेट भारताच्या सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकणे हे जाणीवपूर्वक केलेला, अत्यंत गंभीर स्वरूपाचा अवमान आहे.” संविधानाचा अपमान: “सर्वोच्च न्यायालय हे भारतीय संविधानाचे रक्षणकर्ते आहे. त्यांच्यावरील हल्ला हा न्यायमूर्ती गवई यांच्यावर नसून, देशाच्या न्यायपालिकेवर आणि लोकशाहीच्या स्तंभावर आहे. अशा कृत्याचे समर्थन करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे देशद्रोहाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे.”

इतर वेळी देशभक्तीच्या आणि राष्ट्रवादाच्या गोष्टी करणाऱ्यांनीच देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेचा असा अपमान करणे, हा ढोंगीपणाचा कळस असल्याची टीका शिरगावकर यांनी केली. “सध्या देशातील धर्मांध वातावरण इतके गढूळ झाले आहे की, लोकांना माणुसकी आणि देशापेक्षा आपला धर्म मोठा वाटू लागला आहे. पण आपण हे विसरतो आहोत की, माणुसकीसाठी धर्म असतो; धर्मासाठी माणुसकी नाही. धर्म हा माणसाला एकत्र बांधण्यासाठी असतो, फूट पाडण्यासाठी नाही. सर्वात आधी आपला देश आणि मग बाकीच्या गोष्टी, हे सूत्र आजही आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचा आधार असायला हवे.”

“सध्या देशात धार्मिक डंबिकता खूपच वाढली आहे. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी विरोधकालाच चुकीचे ठरवून त्याच्या चारित्र्यावर चिखलफेक केली जाते, कारण त्यांच्यात वैचारिक वादविवाद करण्याची तेवढी बुद्धी नसते व पात्रताही नसते,” असे खडेबोल त्यांनी सुनावले. “जातीव्यवस्था ही देशाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. ही कीड स्वातंत्र्यानंतर कमी व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने ती जास्तच वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या देशात विकासाच्या मुद्द्यावर राजकारण न करता धर्माच्या नावावर राजकारण केले जाते,” असे सांगत प्रियाताई शिरगावकर यांनी या प्रवृत्तीच्या मुळापर्यंत जाऊन कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button