मद्य विक्री वगळता राज्यातील सर्व दुकाने, आस्थापना आता २४ तास उघडी राहणार!
कर्मचाऱ्यांसाठी साप्ताहिक सुटी बंधनकारक!

मुंबई (कोटा न्यूज नेटवर्क) : १ ऑक्टोबर २०२५ (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, महाराष्ट्र शासन) – महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, २०१७ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. यानुसार, मद्य विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना वगळता राज्यातील सर्व दुकाने, हॉटेल्स, उपहारगृहे, चित्रपटगृहे आणि इतर आस्थापना आता आठवड्याचे सर्व दिवस २४ तास उघडी ठेवण्यास कायदेशीर परवानगी मिळाली आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम, २०१७ च्या कलम १६ (१) (ख) नुसार, मद्य विक्री किंवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना वगळता इतर सर्व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस २४ तास उघड्या ठेवता येतील. आस्थापना २४ तास सुरू ठेवता आल्या तरी, तेथील प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून सलग २४ तासांची साप्ताहिक विश्रांती/सुटी देणे बंधनकारक असेल. अधिनियमातील ‘दिवस’ या शब्दाची व्याख्या मध्यरात्रीपासून सुरू होणारा चोवीस तासांचा कालावधी अशी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटी दिल्यास आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास कायदेशीर अडचण नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
निर्बंध कोणासाठी? परमिट रूम, बिअर बार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक आणि कोणत्याही प्रकारचे मद्य विक्री/पुरवठा करणाऱ्या आस्थापनांसाठी शासनाने सुरू व बंद करण्याच्या वेळा १९/१२/२०१७ आणि ३१/०१/२०२० च्या अधिसूचनेनुसार निश्चित केलेल्या आहेत. या आस्थापनांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी नसेल. स्थानिक प्रशासन किंवा पोलीस विभागाकडून कायद्यात नसतानाही इतर आस्थापनांना २४ तास उघडे ठेवण्यास प्रतिबंध केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या परिपत्रकाद्वारे शासनाने अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक प्रशासनाने अनावश्यक निर्बंध घालू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, व्यापारी संकुले अशा अनेक व्यवसायांना त्यांच्या कामकाजाच्या वेळा वाढवण्याची आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मोठी संधी मिळाली आहे.



