महाराष्ट्र ग्रामीण

पुरस्कारप्राप्त मुरगूड नगरपरिषदेच्या भाड्याच्या इमारतीत स्वच्छतेचे धिंडवडे!

मुरगूड (प्रतिनिधी – बाळसो कांबळे): एका बाजूला मुरगूड नगरपरिषदेला स्वच्छतेचे पुरस्कार मिळत असताना, दुसरीकडे याच नगरपरिषदेच्या मालकीच्या व भाड्याने दिलेल्या इमारतीमध्ये मात्र कमालीची अस्वच्छता पसरल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. या इमारतीच्या मागील बाजूला मोठ्या प्रमाणात गवत, झाडेझुडपे वाढली असून, बाजारपेठेकडून सुंदर दिसणारी ही इमारत मागच्या बाजूने पूर्णपणे विद्रूप झाली आहे. ‘दिव्याखाली अंधार’ अशी म्हणायची वेळ या नगरपरिषदेच्या कारभारावर आली आहे.

मुरगूड नगरपरिषदेचा जुना पाणीप्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही, ही एक बाजू. दुसरीकडे, एकेकाळी कौलारू इमारतीत चालणारे नगरपरिषदेचे कामकाज आता भव्य, नवीन इमारतीत सुरू आहे. तसेच, नगरपरिषदेची जुनी इमारत पाडून त्याजागी एक भलीमोठी व्यावसायिक इमारत उभी करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये सध्या अनेक दुकान गाळे, सिटी सर्व्हे कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, वरील मजल्यावर एलआयसी (LIC) कार्यालय, शेती केंद्र आणि हॉटेल अशा विविध आस्थापना आहेत. या इमारतीमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी गर्दी असते. तसेच, इतर कार्यालये आणि दुकानांमुळे लोकांची मोठी वर्दळ असते. या इमारतीतून नगरपरिषदेला मोठा महसूल मिळत असतो. मात्र, इतका मोठा आर्थिक स्त्रोत असलेली ही इमारत नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्रूप अवस्थेत आहे.

बाजारपेठेच्या बाजूने पाहिल्यास ही इमारत आकर्षक दिसत असली, तरी इमारतीच्या मागील बाजूस पाहिल्यास प्रशासनाच्या निष्क्रियतेचे दर्शन होते. इमारतीच्या मागील भिंतीलगत मोठ्या प्रमाणात गवत, झाडेझुडपे वाढली आहेत. ही वाढलेली झुडपे नगरपरिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या नजरेस पडली नाहीत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एका बाजूला स्वच्छतेचे मोठे दावे आणि पुरस्कार मिळवायचे आणि दुसरीकडे आपल्याच मालमत्तेकडे इतके दुर्लक्ष करायचे, हा विरोधाभास मुरगूडकरांना खटकत आहे. या ठिकाणी अनेक महत्त्वाची शासकीय व व्यावसायिक कार्यालये असल्यामुळे, स्वच्छता विभागाने तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. इमारतीची मागील बाजू स्वच्छ करून, तिचे झालेले विद्रूपीकरण दूर करता येते का, हे पाहणे आवश्यक आहे. मुरगूड नगरपरिषदेच्या अधिकारी व पदाधिकारी यांना लवकरच सद्बुद्धी होऊन, या इमारतीची मागील बाहेरील बाजू स्वच्छ व सुंदर होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. स्वच्छतेच्या पुरस्काराची ‘श्रीमंती’ जपत असताना, प्रत्यक्ष कृतीत मात्र ‘दरिद्री’ राहू नये, अशी भावना जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button