मुरगूड पोलिसांना निवेदन: सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा कागल तालुक्यात तीव्र निषेध!

मुरगूड (बाळासो कांबळे): सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर दिल्लीतील कोर्टरूममध्ये झालेल्या बूटफेकीच्या निषेधार्थ कागल तालुका लोककल्याण समता प्रतिष्ठान आणि भारतीय बौद्ध महासभा (राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या वतीने) यांनी मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले. सरन्यायाधीशांवरील हा हल्ला लोकशाही आणि संविधानावरचा हल्ला असल्याचे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले. मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे साहेब, सहाय्यक फौजदार प्रशांत गोजारे आणि पोलीस हवालदार रवी जाधव यांना शिष्टमंडळाने हे निवेदन सुपूर्द केले. यावेळी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आणि संबंधित हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते व समाजभूषण सातापा कांबळे बस्तवडेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली. त्यांनी आपल्या भाषणात सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी लोककल्याण समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य एच. जी. कांबळे सर, सामाजिक कार्यकर्ते एम. टी. सामंत सर आणि तालुका अध्यक्ष हिरामणी कांबळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी एकमताने घटनेचा निषेध करत, हा हल्ला मनुवादी प्रवृत्तीचा कळस असून, तो संविधानिक पदाचा व व्यक्तीचा अपमान आहे, असे स्पष्ट केले.
या निषेध कार्यक्रमात माजी नगरसेवक व कोषाध्यक्ष दिलीप कांबळे सर, माजी सभापती प्रतिनिधी सुभाष कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव अवघडे, जिल्हा कार्यकारणी प्रतिनिधी आर.आर. प्रधान, विनोद कांबळे मोघार्डेकर, सागर साबळे, भिकाजी कांबळे, चिमगांवचे मारुती कांबळे, आपासो कांबळे, धनाजी कांबळे, बाबासो शितोळे, निवास कांबळे, दत्तात्रय कांबळे, प्रा. ए.व्ही चौगले सर, अर्जुनीचे मा. सरपंच बापुसो कांबळे, रविंद्र सामंत, रामचंद्र मेटकर आणि अजय कांबळे नंद्याळकर इत्यादी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटक व सरपंच अनिल कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याविरोधात कागल तालुक्यातून व्यक्त झालेल्या या निषेधामुळे संविधानाच्या रक्षणासाठी जनतेचा पाठिंबा असल्याचे अधोरेखित झाले.




