महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूडच्या मध्यवर्ती एसटी स्टँडवर गलिच्छ कारभार! शौचालयाचे मलमूत्र उघड्यावर; प्रवाशांकडून तीव्र संताप

मुरगूड: (प्रतिनिधी-बाळासो कांबळे) मुरगूड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एसटी महामंडळाच्या बस स्थानकावर अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ कारभार सुरू असल्याने परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एसटी स्टँडच्या शौचालयातील मलमूत्र उघड्यावर वाहत असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे आरोग्याच्या समस्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुरगूड एसटी स्टँड हा शहराचा मध्यवर्ती बिंदू आहे. याच्या आसपास पाटील कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, ग्रामीण रुग्णालय, मुरगूड विद्यालय हायस्कूल आणि मुरगूड नगरपरिषद कार्यालय यांसारखे महत्त्वपूर्ण आणि सुसज्ज परिसर आहेत. असे असतानाही गारगोटी डेपोच्या देखरेखेखाली असलेल्या या एसटी स्टँडवर अत्यंत दुर्लक्ष केले जात आहे. बस स्थानकाच्या आवारात असलेल्या शौचालयातील मलमूत्र थेट उघड्यावर वाहत आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. हा मैला वाहून रस्त्यावरून जात असल्याने या भागातून ये-जा करणाऱ्या लोकांना आपला नाक दाबून जावे लागत आहे. प्रवाशांना एसटी स्टँड आहे की मैलाचा खड्डा, असा प्रश्न पडला आहे. येथील खासगी खोकेधारक देखील या अस्वच्छतेमुळे अक्षरश: वैतागून गेले आहेत.

एसटी स्टँडच्या अगदी समोर ग्रामीण रुग्णालय आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारींची सोय नाही, आणि जी गटार ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीत आहे, तिचीही स्वच्छता नीट केलेली नाही. गटारीच्या बाजूला अर्धवट पेटलेले प्लास्टिक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील आवारात वाढलेले मोठे गवत यामुळे डासांचा (मच्छरांचा) प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका आहे. एसटी स्टँडच्या आवारातही मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. या सर्व गलिच्छपणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हा अत्यंत गलिच्छ प्रकार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे की नाही, याबाबत शंका आहे, परंतु या ठिकाणी तातडीने स्वच्छता होणे अत्यंत आवश्यक आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने आणि जागृत मालक फाऊंडेशनने मुरगूड नगरपरिषदेला आवाहन केले आहे की, त्यांनी एसटी डेपोला तातडीने नोटीस काढून शौचालयाचे मलमूत्र उघड्यावर सोडल्याबद्दल सक्त कारवाई करावी. एसटी डेपोने लवकरात लवकर या ठिकाणची पूर्ण स्वच्छता करावी, अन्यथा या दुर्लक्षाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष आणि जागृत मालक फाऊंडेशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button