महाराष्ट्र ग्रामीण

गांधीनगरमध्ये भर वस्तीत ग्रामपंचायत सदस्याच्या घरात चोरी!

गांधीनगर (सलीम शेख) : कोल्हापूरजवळील गांधीनगर येथे थेट पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर, भर वस्तीत असलेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या बंद घरात पहाटेच्या वेळी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून, ही चोरी प्रशासनाला चोरट्यांनी दिलेले ‘ओपन चॅलेंज’ असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगर ग्रामपंचायतीचे सदस्य गजेंद्र भीमराव हेगडे यांच्या राहत्या घरी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हेगडे यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील जुनी तांब्याची भांडी, गॅस टाकी आणि रोख रक्कम पाच हजार रुपये असा सुमारे चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
विशेष बाब म्हणजे, चोरीची ही घटना भर वस्तीत आणि पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच्या परिसरात घडली आहे. आजूबाजूला शेजारी उपस्थित असतानाही चोरट्यांनी इतक्या धाडसाने चोरी केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. “पोलीस ठाण्याजवळ, भर वस्तीत असे प्रकार घडत असतील, तर ही थेट नागरिक आणि प्रशासनाला चोरट्यांनी दिलेली उघड आव्हान दिलेले आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया गल्लीतील नागरिकांनी व्यक्त केल्या.
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या घरातच चोरी झाल्याने, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिकांनी तत्काळ चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना पकडावे, अशी मागणी जोर धरली आहे. या घटनेमुळे गांधीनगर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पोलीस या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button