महाराष्ट्र ग्रामीण

दारूबंदी आंदोलनाला वेगळे वळण! महिलांची बदनामी करणाऱ्या चार जणांवर गोकुळ शिरगावमध्ये गुन्हा दाखल

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी ): गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील दारूबंदी आंदोलनाने आता अत्यंत गंभीर आणि कायदेशीर वळण घेतले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांची जाणीवपूर्वक खोटी बदनामी करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या आरोपींवर अब्रू नुकसानीचा (Defamation) दावा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही परिषदेने दिला आहे. गोकुळ शिरगाव येथे गेल्या काही दिवसांपासून दारूच्या दुकानांविरोधात महिलांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असताना, काही व्यक्तींकडून महिला सन्मान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानुसार, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये सागर शिवाजी पाटील, श्यामराव बापू पाटील (ग्रा.पं. सदस्य), निलेश शंकर पाटील, महेश दत्तात्रय यमगेकर या चार आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

आरोपींनी सोशल मीडिया तसेच ग्रामपंचायत परिसरात अपमानास्पद आणि बदनामीकारक संदेश प्रसारित केले. या संदेशांद्वारे महिला नेत्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरून त्यांची वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी सागर पाटील याने “मी दोन हाफ मर्डर केले आहेत, मला हलक्यात घेऊन नका,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. महेश यमगेकर आणि निलेश पाटील यांनी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर पसरवण्यात सक्रिय सहभाग घेतला. या गंभीर आरोपांनुसार आरोपींवर मानहानी/बदनामी) आणि गुन्हेगारी धमकी असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात बोलताना महिला सन्मान परिषदेच्या अध्यक्षा शिरगावकर म्हणाल्या, “आमचं दारूबंदी आंदोलन अत्यंत प्रामाणिक आणि स्वच्छ हेतूने सुरू आहे. महिलांचा सन्मान, गावातील शांतता आणि ऐतिहासिक गोकुळ नगरीचे पावित्र्य टिकवण्यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत.” त्यांनी स्पष्ट केले की, काही बार, शॉपी चालक आणि त्यांचे सहकारी हेतुपुरस्सर खोटी माहिती आणि खालच्या थरातील भाषा वापरून आंदोलन व या गावाचे नाव बदनाम करत आहेत.

स्वार्थासाठी आणि स्वतःच्या चुका लपवण्यासाठी ऐतिहासिक गोकुळ नगरीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे सर्व आरोपांचे आणि बदनामीकारक मजकुराचे पुरावे आहेत. जे कोणी विनाकारण माझी बदनामी करत आहेत, त्यांना यापुढे सोडणार नाही. वकिलांशी चर्चा झाली असून लवकरच अब्रू नुकसानीचा दावा (Defamation Suit) दाखल करणार आहोत,” असे शिरगावकर यांनी ठामपणे सांगितले. या कायदेशीर कारवाईचा उद्देश केवळ आंदोलन बदनाम करणाऱ्यांना थांबवणे हा असून, समाजात चुकीची माहिती पसरवून कोणाचीही प्रतिमा खराब करणे योग्य नाही, असेही त्यांनी नमूद केले.

या कायदेशीर कारवाईमुळे दारूबंदी आंदोलनाला आणखी एक नवीन आणि गंभीर बाजू मिळाली असून, या संपूर्ण प्रकरणाकडे आता कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल इदे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button