शहापूरमध्ये बंद घराचे कुलूप तोडून ५२ हजारांचा ऐवज लंपास!

हातकणंगले (सलीम शेख ) : शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील तारदाळ येथे एका बंद घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत सुरेश रणदिवे (वय ३४, व्यवसाय-मजुरी, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच दरम्यान, दिनांक १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या वेळेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडला. दरवाज्याचा कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि घरातील तिजोरी फोडली.
चोरट्याने घरातील तिजोरीमध्ये ठेवलेली रोख रक्कम २,००० रुपये (२० रुपयांच्या १०० नोटा) तसेच एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठन, ज्याची अंदाजित किंमत ५०,००० रुपये आहे, असा एकूण ५२,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, हे सोन्याचे गंठन फिर्यादी रणदिवे यांच्या बहिणी राणी दीपक बचुटे (रा. सोलापूर) यांनी सुरक्षिततेसाठी त्यांच्याकडे ठेवले होते.
या चोरीची माहिती मिळताच फिर्यादीने शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) कुटे हे करत आहेत. वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांना पकडावे अशी मागणी होत आहे.




