महात्मा फुले मार्केटमुळे कागल नगरपरिषदेला वर्षाला 50 लाख भाडे! सुधारित नियमानुसार गाळ्यांचा लिलाव लवकरच!

कागल (सलीम शेख ) : कागल नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेले आधुनिक व सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले महात्मा फुले मार्केट आता नगरपरिषदेच्या उत्पन्नात महत्त्वपूर्ण भर घालणार आहे. या मार्केटचे लोकार्पण नामदार अजित दादा पवार व नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले होते.
नामदार हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून प्राप्त झालेल्या १०कोटी निधीतून पुढील बाजूस २७ गाळे आणि मागील बाजूस ‘ब्लॉक बी’ मध्ये ५६ गाळे अत्याधुनिक सुविधांसह व वातानुकूलित बांधकामासह उभारण्यात आले आहेत.
या गाळ्यांचा तीन वेळा जाहीर लिलाव करूनही नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. पूर्वीच्या मालमत्ता हस्तांतर नियम १९८३ मध्ये क्लिष्टता असल्याने ही स्थिती उद्भवली होती. शासनाच्या लक्षात आल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळात हा विषय घेऊन सुधारित मालमत्ता हस्तांतर भाडे नियम २०२५ मंजूर करण्यात आले आहेत. या नियमांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध होऊन अंतिम मान्यतेसाठी सादर झाला आहे. नवीन नियमांमुळे व्यापाऱ्यांना सुलभ दरात गाळे उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. समोरील बाजूस असलेल्या ‘ब्लॉक ए’ मध्ये ग्राउंड फ्लोअरवरील गाळे वगळता, वरील सर्व मजल्यांवरील इमारत शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाला तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने देण्याचा निर्णय झाला आहे. या उपक्रमामुळे कागल नगरपरिषदेस दरवर्षी सुमारे ५० लक्ष रुपये भाड्याच्या स्वरूपात प्राप्त होणार आहेत. यामुळे नगरपरिषदेच्या आर्थिक बळकटीस हातभार लागणार आहे. ‘बी’ ब्लॉकमधील सर्व गाळे व ‘ए’ ब्लॉकमधील ग्राउंड फ्लोअरवरील गाळे शासनाच्या सुधारित मालमत्ता हस्तांतर नियमांप्रमाणे लवकरच लिलाव प्रक्रिया करून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उर्वरित गाळे लिलाव प्रक्रियेद्वारे लवकरच खुले केले जातील.
हा निर्णय कागल नगरपरिषदेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेण्यात आलेला असून, तो व्यापारी तथा नागरिकांना लाभदायक ठरणार आहे. सर्व गाळेधारकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कागल नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.




