महाराष्ट्र ग्रामीण

कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत पारदर्शकतेवर भर – तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे आवाहन!

कागल (सलीम शेख ) : कागल नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत जनतेच्या मनातील खरा प्रतिनिधी सभागृहात पोहोचावा यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सर्व पक्षांना निकोप व पारदर्शक निवडणुकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कागल नगरपालिकाचे मुख्य अधिकारी अजय पाटणकर यांनीही उपस्थितीना मार्गदर्शन केले.नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत वाकडे यांनी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रभाग क्रमांक स्पष्टपणे नमूद करावा, तीन चिन्हांची निवड करावी, तसेच जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील स्वतंत्रपणे द्यावा अशी सूचना केली. शपथपत्रातील कोणताही रकाना रिकामा ठेवू नये, अन्यथा अर्ज अपात्र ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. जाती प्रमाणपत्र व पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र मूळ स्वरूपात सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुख्याधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी अजय पाटणकर यांनी उमेदवार हा नगरपालिकेच्या हद्दीत राहणारा असावा, पालिकेची थकबाकी नसावी आणि ‘ना देय प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नामनिर्देशन पत्रात सुचक व उमेदवार यांची माहिती काटेकोरपणे भरावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. अॅड. रुपेश वाघमारे, दीपक मगर, अझरुद्दीन तासीलदार,महेश घाटगे, दिलीप मुळीक, सम्राट सणगर, अमित पिष्टे, सागर गुरव, अजित मोडेकर, विद्या गिरी यांच्यासह इच्छुक अपक्ष उमेदवार,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट, भाजप,शिवसेना उबाठा गट यांचे पदाधिकारी चर्चेत सहभागी झाले. बैठकीत विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. यामुळे उमेदवार व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत स्पष्टता निर्माण झाली असून, निकोप निवडणुकीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे वातावरण तयार झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button