सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच रस्ते खराब; कागल PWD वर ग्रामस्थांचा संताप!

चिखली (प्रतिनिधी – बाळासो कांबळे) : कागल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ढिसाळ नियोजनामुळे आणि ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे चिखली गावातून कोडणी गावाकडे जाणारा रस्ता अवघ्या दीड वर्षातच पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. भैरवनाथ देवालय ते कोडणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये PWD कागल विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, इतक्या कमी कालावधीतच रस्ता पूर्णपणे उखडला आणि जागोजागी खड्डे पडले. ‘एवढ्या लवकर रस्ता नादुरुस्त कसा झाला?’ ही एकच चर्चा आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये सुरू आहे.
या दुर्घटनेला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
- ठेकेदारांनी कोणत्या दर्जाचे काम केले, याची चौकशी होत नाही का?
- रस्ते खराब झाल्यावर त्याची जबाबदारी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची की निष्काळजीपणा करणाऱ्या PWD विभागाची?
- अशा निष्काळजी लोकप्रतिनिधींवर किंवा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई का होत नाही?
या प्रश्नांवरून लोकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे.
रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत आणि त्याच्या टिकाऊपणावर नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. नवीन रस्ता बांधताना तो किती वर्षे टिकेल, याची हमी घेणे आवश्यक आहे. तसेच, रस्ता खराब झाल्यास त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच असायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे. चिखली गावचे भीम ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष आणि चळवळीचे परखड मत मांडणारे प्रदीप कांबळे यांनी या खराब रस्त्याच्या समस्येला वाचा फोडली आहे.
कांबळे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे की, कोणताही नवीन रस्ता तयार करताना, रस्त्याच्या बाजूला संबंधित ठेकेदाराचे नाव, कामाचा दर्जा आणि रस्ता किती वर्ष टिकेल याची माहिती देणारा बोर्ड लावणे बंधनकारक करावे. यामुळे ठेकेदारांवर कामाचा दर्जा टिकवून ठेवण्याची ‘दहशत’ (जबाबदारी) राहील.
यावेळी प्रदीप कांबळे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने या खराब रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर केली नाही, तर भीम ब्रिगेड आणि ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, कागल यांना जाब विचारला जाईल आणि तीव्र आंदोलन केले जाईल.




