कागल अनंत रोटो येथील श्रीराम सेवक नगर परिसरात गवे दिसले; शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान!

कागल (सलीम शेख): कागल तालुक्यातील अनंत रोटो परिसरात पुन्हा एकदा गव्यांचा वावर दिसून आला असून श्रीराम सेवक नगर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी संदीप माळी यांच्या बंगल्याजवळील शेतात कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्यांना जाग आली. त्यांनी बाहेर पाहिले असता चार मोठे जंगली प्राणी शेतात फिरताना दिसले. काही वेळाने हे प्राणी पुढे निघून गेले.
सकाळी शेतात आढळलेले ठसे पाहून वन विभागाचे अधिकारी जगदाळे यांनी पाहणी केली. त्यांनी हे ठसे गव्यांचेच असल्याची पुष्टी केली.गव्यांच्या वावरामुळे संदीप माळी यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने गस्त सुरू केली असून परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पूर्वीही गव्यांचा वावर
कागल परिसरात यापूर्वीही गव्यांचा वावर दिसून आला होता. अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने आता गव्यांच्या कळपामुळे स्थानिक शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.




