कागल निवडणुकीत माघारीचे सत्र, बिनविरोधाची शक्यता!

कागल (सलीम शेख ) : कागल नगरपरिषद निवडणुकीत आजपर्यंत ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीचे चित्र बदलू लागले आहे. माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुश्रीफ-घाटगे गटाकडून अपक्ष व इतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, गाठीभेटी व चर्चांमुळे काही प्रभागांत बिनविरोध निवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस कमी होताना दिसत आहे.
तथापि, काही भागांत कार्यकर्त्यांची नाराजी अद्याप कायम असून, विशेषतः घाटगे गटातील अंतर्गत मतभेदांमुळे निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा आहे. या नाराजीमुळे घाटगे गटातील उमेदवारांची संख्या कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, माघारीच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये हसन मुश्रीफ गट पुन्हा एकदा नगरपरिषदेवर वर्चस्व राखणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.
उद्या किती उमेदवार अर्ज मागे घेतात, यावर संपूर्ण निवडणुकीचे समीकरण बदलणार असून, कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.




