कागल तालुक्यात करनूर येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये सापडून दुर्दैवी अंत!

कागल (सलीम शेख ) : कागल तालुक्यातील करनूर येथील एक प्रगतशील शेतकरी दिलीप पांडुरंग पाटील (वय ४९) यांचा ट्रॅक्टरमध्ये तोल जाऊन रोटरमध्ये सापडल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातामुळे संपूर्ण करनूरसह कागल तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप पांडुरंग पाटील हे वंदूर येथे शेतीच्या कामासाठी आपला ट्रॅक्टर घेऊन गेले होते. शेतीचे काम सुरू असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडून रोटरमध्ये अडकले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.
या घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दिलीप पाटील हे करनूर येथील श्रीकृष्ण विकास सेवा संस्थेचे माजी संचालक होते. शेतीत प्रगती साधलेला एक कार्यशील शेतकरी अकाली गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, चार भाऊ, भावजा, तीन वहिनी असा मोठा परिवार आहे.
या अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.




