महाराष्ट्र ग्रामीण

पोलिसांचे निलंबन: उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने ‘सेवेतून बडतर्फ!

फलटण : पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे आणि गंभीर गैरवर्तन केल्याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटकेत असलेले निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बाळासाहेब बदने यांना अखेर शासकीय सेवेतून कायमस्वरूपी ‘बडतर्फ’ करण्यात आले आहे. या कठोर कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने हे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, सातारा येथे कार्यरत होते. त्यांच्यावर गंभीर आरोप असलेले गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, बदने यांनी पोलीस दलाचे संपूर्ण ज्ञान असूनही अत्यंत बेफिकिरी, नैतिक अधःपतन (Moral Turpitude) आणि दुर्वर्तन (Misconduct) केले. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक या सन्माननीय पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करत विकृतपणे वर्तन केले. त्यांच्या या कृत्यांमुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यांचे कृत्य हे केवळ कर्तव्य पालनातच नव्हे, तर त्यांच्या दैनंदिन जीवनातील वर्तनही संशयास्पद आणि पोलीस दलाच्या नियमांना धरून नव्हते.

प्रेस नोटमध्ये स्पष्ट केल्यानुसार, उपनिरीक्षक बदने यांचे कृत्य अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. अशा व्यक्तीला शासकीय सेवेत पुढे ठेवणे हे सार्वजनिक हित आणि लोकहिताच्या दृष्टीने योग्य नाही. त्यानुसार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनील फुलारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. भारतीय राज्यघटनेच्या संबंधित अनुच्छेदांच्या (कलमां) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत, त्यांनी दिनांक ०४/११/२०२५ पासून गोपाळ बाळासाहेब बदने यांना ‘शासकीय सेवेतून बडतर्फ’ करण्याचा कठोर निर्णय घेतला. या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये शिस्त आणि कर्तव्यनिष्ठतेचे महत्त्व अधोरेखित झाले असून, गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पोलीस दल माफ करणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button