मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडथळ्यांचा प्रयत्न ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल!

गोकुळ शिरगाव (इरफान मुल्ला ) : दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ कोल्हापूर येथील उजळाईवाडी परिसरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गोकुळ शिगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी स्वस्तिक पाटील व अन्य चार ते पाच साथीदार यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.४० वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा ताफा कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील एका कार्यकर्त्याने बेकायदेशीर रस्त्यावर ऊस व उसाचे तुकडे टाकले आणि ताफ्याला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केला. या कृतीमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला आणि व्ही.व्ही.आय.पी. व्यक्तींच्या जीविताला धोका निर्माण होण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किशोर अंबुडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीवर गोकुळ शिगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन करण्यात आले असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक टि. जे. मगदूम मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करत आहेत.




