महाराष्ट्र ग्रामीण

ऊस दरासाठी आणि काटामारी विरोधात कोल्हापुरात बेमुदत ठिय्या आंदोलन!

कोल्हापूर (सलीम शेख ) : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रादेशिक सह. संचालक (साखर), कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर जय शिवराय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधात हा एल्गार पुकारण्यात आला आहे.
मागील गळीत हंगामातील आर.एस.एफ. नुसार तातडीने हिशोब देऊन त्यातील नफा द्यावा, ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. कायद्यानुसार, आर्थिक वर्ष संपल्यानंतर १२० दिवसांत हा हिशोब येणे बंधनकारक असतानाही साखर सहसंचालकांनी याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. तसेच, चालू हंगामासाठी ऊस दर एफ.आर.पी. अधिक २०० रुपये देण्याची मागणी जोर धरत आहे.
या आंदोलनात कारखान्यांमधील काटामारीचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. काटा यंत्रणेत रिमोट, सिम, जंक्शन बॉक्समध्ये छेडछाड करून सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे तसेच हाताने पावत्यांमध्ये होणारा घोळ या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी, अशी मागणी आहे. याशिवाय, सर्व कारखान्यांनी ऊस तोडीसाठी क्रम पाळी अवलंब करावा आणि ऊस वाहतूक अंतरानुसार घ्यावी, या मागण्यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांनी बाहेरून वजन करून नेलेले वजन ग्राह्य धरण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या गंभीर मागण्यांबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांनी केवळ मोघम नोटिसा काढून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला, जो संघटनांनी धुडकावून लावला आहे. कोणतीही ठोस कारवाई आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या घामाच्या पैशांसाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. साखर आयुक्तांनी आणि सहसंचालकांनी त्वरित ठोस निर्णय घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button