भावपूर्ण निरोप! ‘ते’ ऐतिहासिक प्रवेशद्वार आज होणार इतिहास जमा..!

कोल्हापूर(प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात गेली २८ वर्षे भर घालणारे आणि प्रत्येक कोल्हापूरकराला आपल्या घराची आठवण करून देणारे, तावडे हॉटेल येथील ऐतिहासिक प्रवेशद्वार आज (दिनांक: 7 नोव्हेंबर २०२५ रात्रीपासून इतिहास जमा होणार आहे. या प्रवेशद्वाराच्या जागी लवकरच नवीन प्रवेशद्वार उभारणीचे काम सुरू होणार असले तरी, जुन्या आठवणींचा हा वारसा आज थांबणार असल्याने कोल्हापूरकरांच्या मनात गोंधळ आणि हळवेपणा दाटून आला आहे.
आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कितीही दूर गेलो आणि काही दिवसांनी कोल्हापुरात परत यायचे झाल्यास, दूरचा प्रवास करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तावडे हॉटेलजवळचे हे प्रवेशद्वार नजरेस पडताच एक वेगळी ऊर्जा मिळत असे. “अखेर घरी आलो!” ही भावना एका क्षणात यायची आणि प्रवासाचा सर्व थकवा जणू कुठच्या कुठे पळून जायचा. कोल्हापूर महानगरपालिका आणि भारती एक्स्पोअँड्स यांच्या वतीने १९९७ साली हे भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. तब्बल २८ वर्षे, या प्रवेशद्वाराने शहराच्या मुख्य वेशीचे काम केले. काळानुरूप, २८ वर्षांनंतर हे प्रवेशद्वार आता मोडकळीस आले आहे. प्रवेशद्वाराची झालेली दुरवस्था पाहता, भविष्यात एखादा मोठा अपघात घडून जीवितहानी होऊ नये, याकरिता हा कटू पण आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियावर या प्रवेशद्वाराच्या दुरवस्थेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. मा. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी करून तत्काळ प्रवेशद्वार उतरवून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने, 7 नोव्हेंबर २०२५ रात्री १० वाजल्यापासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रवेशद्वार उतरवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या वेळेत मार्गावर काही बदल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने, समस्त कोल्हापूरकरांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जुने प्रवेशद्वार उतरवून घेतल्यानंतर, याच ठिकाणी शहराची नवीन ओळख देणारे आणि भविष्याच्या गरजा पूर्ण करणारे नवे भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार आहे.




