महाराष्ट्र ग्रामीण

खाऊ गल्ली परिसरात वाहतुकीत शिस्त! शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई; ७० वाहनांवर ई-चलन, ₹५०,००० दंड!

कोल्हापूर (सलीम शेख ) : कोल्हापूर शहरातील विविध खाऊ गल्ली परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि रहदारीतील अडथळे दूर करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने शुक्रवारी (दि. ७ नोव्हेंबर) रोजी रात्री विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ७० वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, एकूण ५०,००० इतका दंड आकारण्यात आला आहे.शहरातील अनेक महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पितळी गणपती चौक,धैर्यप्रसाद चौक,गोल्ड जिम परिसर,डी. वाय. पाटील मॉल,शाहू टोल नाका खाऊ गल्ली,दसरा चौक, टायटन शोरूम चौक,सावित्रीबाई फुले हॉस्पिटल चौक, गोखले कॉलेज चौक ,यल्लमा ओढा,हॉकी स्टेडियम चौक,इंदिरासागर चौक,मिरजकर तिकटी,खासबाग मैदान बिंदू चौक,शिवाजी पुतळा परिसर,महापालिका परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली.

अनेक वाहनधारक खाद्यपदार्थांच्या गाड्यांसमोर आणि रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करत असल्याचे शहर वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले. यानंतर, पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मात्रे आणि पोलीस अंमलदारांच्या मदतीने क्रेन व पोलीस पथकांचा वापर करून ही कारवाई केली. अनेक अडथळा ठरणारी वाहने हटवण्यात आली, तर बेशिस्त वाहनधारकांकडून ई-चलनद्वारे दंड वसूल करण्यात आला.

शहर वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की, खाऊ गल्ली किंवा गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्क करताना वाहतूक अडथळा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. तसेच, रहदारीस अडथळा करणारे, डबल पार्किंग करणारे आणि बेशिस्तपणे वाहन उभे करणाऱ्यांवर पुढील काळातही व्यापक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेकडून देण्यात आला आहे.
या कारवाईमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button