सेवानिवृत्त नायब तहसिलदार लाच घेताना पकडला!

कोल्हापूर (सलीम शेख) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरच्या पथकाने सेवानिवृत्त नायब तहसिलदार ईलाही मिरा मुल्ला (वय ७१) यांना रंगेहाथ अटक केली. भूसंपादन विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असताना त्यांनी तक्रारदाराकडून ८,००० रुपयांची लाच स्वीकारली. मिळालेल्या माहितीनुसार, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील गट नं. ९८७ मधील शेती जमिनीचे दुधगंगा कालव्यासाठी भूसंपादन झाले होते. मोबदल्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आरोपीने १०,००० रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला.
१२ नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईत आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली फौजदार प्रकाश भंडारे व सहकाऱ्यांनी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाच मागणी झाल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.




