कोल्हापूर महापालिकेची कारवाई: 12 दुकानगाळे, 2 मटण दुकान व 3 शेड निष्काशीत!

कोल्हापूर (सलीम शेख) : कोल्हापूर महानगरपालिका (KMC) प्रशासनाने शुक्रवारी बी वॉर्ड, मंगळवार पेठ येथील शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई केली. इस्टेट विभागामार्फत ही कारवाई करून परिसरातील जागा मोकळी करण्यात आली आहे. मनपाच्या या धडक मोहिमेत एकूण १२ दुकानगाळे, २ मटण दुकाने, १ खुली जागा आणि विनापरवाना उभारलेली ३ शेड निष्कासित करण्यात आली. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरील सर्व अनधिकृत बांधकामे आज (शुक्रवारी) हटविण्यात आली आहेत. ही महत्त्वपूर्ण कारवाई प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या कठोर मार्गदर्शनाखाली पार पडली. महापालिकेच्या विविध विभागांच्या संयुक्तीक पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
अतिरिक्त आयुक्त: शिल्पा दरेकर, उप-आयुक्त: किरण धनवाडे, सहा. आयुक्त: स्वाती दुधाणे, इस्टेट ऑफिसर: विलास साळोखे, अतिक्रमण विभाग, विभागीय कार्यालय क्र. 02, अग्निशमन विभाग मनपाच्या या पथकाने कोणताही अनुचित प्रकार न घडता, आवश्यक पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण केली. शाहू खासबाग कुस्ती मैदान आणि नाट्यगृह परिसर हा शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाचा आहे. या परिसरात झालेले अतिक्रमण खेळाडू, नागरिक आणि कलाप्रेमींसाठी अडचणीचे ठरत होते. महापालिकेच्या या कारवाईमुळे हा महत्त्वाचा परिसर पुन्हा मोकळा झाला आहे.
महापालिकेने शहराचे सौंदर्य आणि नागरिकांच्या सोयीसाठी उचललेल्या या पावलाचे परिसरातील नागरिकांनी आणि हितचिंतकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी यावेळी केली. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आणि सुव्यवस्थेसाठी महापालिकेच्या वतीने यापुढेही अशी कारवाई सुरूच राहील, असे संकेत प्रशासनाने दिले आहेत.




