कांबळे दांपत्यावर हल्ला: चौघांची धिंड, पाच दिवसांची पोलीस कोठडी!

पुलाची शिरोली / प्रतिनिधी: पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा हल्लेखोरांना गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धिंड काढली. या आरोपींना वठगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दिगंबर कांबळे व त्यांची पत्नी आरती हे विलासनगरमध्ये जेवण करून फेरफटका मारण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून कांबळे दांपत्यासह त्यांच्या मुलावर धारदार अडक्यासारख्या हत्यारांनी प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी वैभव राजू बेडेकर (२५), आर्यन अनिल शिंदे (१८), साहिल अरुण बंगडे (२२) व साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिदुक (२१) या चौघांना अटक केली आहे. या चौघांनी हातात धारदार अडके घेऊन परिसरात दहशत माजवत दांपत्यावर वार केले. हल्ल्यात दिगंबर कांबळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी आरती कांबळे यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत चारही आरोपींना अटक केली. गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी या आरोपींची परिसरात धिंड काढून जनक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांना पुढील तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.




