महाराष्ट्र ग्रामीण

मुरगूड नगरपरिषद निवडणुकीत आरपीआय (आठवले) पक्ष स्वबळावर लढणार!

निवडणुकांमध्ये 'कृती शून्य' आश्वासनांना कंटाळून महत्त्वपूर्ण निर्णय

मुरगूड (बाळासो कांबळे ): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Municipal Council) निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने मुरगूड नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ठाम निर्धार करण्यात आला असून, या निर्णयामुळे मुरगूडच्या राजकीय पटलावर एक नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. आरपीआय (आठवले) पक्षाने आजवर अनेक निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत युती केली किंवा पाठिंबा दिला. परंतु, या वेळी पक्षाने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, “आजपर्यंत जेव्हा जेव्हा निवडणुका आल्या, तेव्हा तेव्हा रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरून फक्त आश्वासन देण्यात आली. परंतु, प्रत्यक्षात जमिनीवरची कृती शून्य राहिली.” आंबेडकर चळवळ कायम रस्त्यावरची लढाई लढत आली आहे. निवडणुकांमध्ये वारंवार निराशाच पदरी आल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. आरपीआय (आठवले) पक्षाने आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या भुलथापांना किंवा फसव्या आश्वासनांना बळी न पडण्याचा निर्धार केला आहे.

जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत पक्षाने याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र यापुढे असे होणार नाही, असा इशारा पक्षाने दिला आहे. सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आता आम्ही कोणत्या ही भुलथापाना बळी पडणार नाही. मुरगूड नगरपरिषद निवडणूक लढवणार आहोत. दोनच दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” आरपीआय (आठवले) पक्षाच्या या स्वबळावरील भूमिकेमुळे मुरगूड नगरपरिषदेच्या निवडणुकीत दलित आणि आंबेडकरी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. यामुळे निवडणुकीतील पारंपरिक राजकीय समीकरणे बदलून, इतर प्रमुख पक्षांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button