महाराष्ट्र ग्रामीण

रणधुमाळी २०२५: मुरगूड नगरपरिषद निवडणुकीला ‘धडाक्यात’ सुरुवात!!

८ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीमुळे मुरगूडमध्ये राजकीय 'जमवाजमव' शिगेला

मुरगूड (बाळासो कांबळे): तब्बल ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुरगूड नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे येथील राजकीय वातावरण धडाक्याने तापले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही गोटात धाकधुक, जमवाजमव, फोडाफोडी आणि युती-आघाडीतील नाराजीचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. निवडणूक जाहीर होताच मुरगूडच्या गल्लीच्या कोपऱ्यांवर ‘गुलाल कोणाचा?’ याची खमंग चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे, मागील सत्ताधारी गट आपल्या विकासकामांचा डोंगर जनतेसमोर ठेवून पुन्हा एकदा कौल मागताना दिसत आहे.

तर दुसरीकडे, विरोधकांनी मात्र सध्या शांत पवित्रा घेतला असून, पडद्यामागून निवडणुकीची रणनीती आखण्यात ते मग्न आहेत. आचारसंहिता लागू झाल्याने काही इच्छुकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत आहे, तर काहींचे समाधान हास्य हरवल्यासारखे भासत आहे. मुरगूडच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणारी एक बातमी म्हणजे, राजे गटाने आगामी मुरगूड नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व जागा लढवण्यावर हा गट ठाम आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत राजे गट, मंडलिक गट, पाटील गट आणि मुश्रीफ गट हे प्रमुख गट रिंगणात उतरणार आहेत. सध्या आघाडी आणि युतीबाबत गटप्रमुखांमध्ये बोलणी आणि चर्चा सुरू असल्या तरी, अंतिम चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.

यंदा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे अंतर्गत गटबाजी आणि नाराजी वाढण्याची शक्यता आहे. काही निष्ठावान उमेदवार आपल्या नेत्यांवर पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत. परंतु, अनेक महत्त्वाकांक्षी इच्छुक असेही आहेत की, जर त्यांना तिकिट (नामनिर्देशन) मिळाले नाही, तर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार, यात शंका नाही. अजूनही युती आणि जागावाटपाचे चित्र स्पष्ट नसले तरी, इच्छुकांचा उत्साह मात्र ओसांडून वाहत आहे. मुरगूड नगरपरिषदेची निवडणूक म्हणजे नेहमीच चर्चा, भेटीगाठी आणि राजकीय डावपेचांनी भरलेली असते. मात्र, ८ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर होणारी ही २०२५ ची ‘फाइट’ आगळीवेगळी आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे. आता मुरगूड नगरपरिषद नागरसेवेचा खुर्चीवर बसण्याचा मान कोणत्या गटाला देते, हे येणारा काळच ठरवेल. या निवडणुकीत जनतेचा कौल निर्णायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button