१०० जणांचं बलिदान देऊ, पण नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही-अभिनेता सयाजी शिंदेंचा संताप

नाशिक (कोटा न्यूज़ नेटवर्क): पर्यावरणप्रेमी अभिनेता आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये प्रस्तावित असलेल्या विकासकामांसाठी किंवा आगामी कुंभमेळ्याच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीला तीव्र शब्दांत विरोध दर्शवला आहे. “शंभर जणांचे बलिदान देऊ, पण नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही,” असा संतप्त इशारा देत त्यांनी प्रशासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे.
सयाजी शिंदे यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांची झाडे वाचवण्याबद्दलची भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या वक्तव्यातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: नाशिकमध्ये एकही झाड तोडू देणार नाही. १०० जणांचं बलिदान देऊ, पण झाडं वाचवू. माणसं पेटून उठतील, मी फक्त निमित्त असेन.” आगामी कुंभमेळ्यासाठी जर झाडे तोडण्याचा घाट घातला जात असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. याला खूप मोठा विरोध करावा लागेल. विकास कामांसाठी झाडे तोडून त्याऐवजी दुसरी दहा झाडे लावण्याचे आश्वासन देणारी सरकारी भूमिका त्यांनी ‘फालतू विधान’ म्हणत फेटाळून लावली. “झाड लावून दहा वर्षं त्याची जोपासना करणे म्हणजे एक माणसाचा जन्म घालवण्यासारखं आहे. एका क्षणात ते तोडणे म्हणजे क्रौर्य आहे.”
सध्याचे सरकार ‘आपलं’ असूनही ते अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहे. सरकारचे हे धोरण विनाशकारी आहे. प्रशासनाच्या या वृत्तीमुळे आपल्याला अतिशय राग येत आहे, हे स्पष्ट करताना त्यांनी थेट, “खरं तर माझ्या तोंडात शिव्या येतायत” अशा शब्दांत आपला तीव्र संताप व्यक्त केला. सयाजी शिंदे हे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘देवराई’ (वृक्ष संवर्धन आणि लागवडीचा एक प्रकल्प) च्या माध्यमातून वृक्षारोपणाची आणि संवर्धनाची मोठी चळवळ चालवत आहेत. यापूर्वीही त्यांनी नाशिकमधील उंटवाडी येथील ऐतिहासिक वडाचे झाड वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींना पाठिंबा दिला होता.
त्यांनी यावेळी स्पष्ट केले की, केवळ वृक्षारोपण करणे पुरेसे नाही, तर लावलेल्या झाडांना जगवणे अधिक महत्त्वाचे आहे. विकास हवा, पण तो झाडे तोडून नसावा.




