महाराष्ट्र ग्रामीण

राधानगरी अभयारण्यात फुलपाखरांचे आकर्षक उद्यान – पर्यटकांची वाढती गर्दी!

राधानगरी (सलीम शेख ) : महाराष्ट्रातील पहिले अधिकृत अभयारण्य असलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्य आता केवळ गव्यांसाठीच नव्हे, तर फुलपाखरांच्या अद्भुत दुनियेसाठी देखील ओळखले जात आहे. सन १९५८ मध्ये स्थापन झालेले आणि सन २०१२ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले हे ३५१.१६ चौ. किमी. क्षेत्राचे अभयारण्य जैवविविधतेसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच महत्त्वाच्या क्षेत्रातील विभागीय वन कार्यालयाच्या परिसरात एक आकर्षक फुलपाखरू उद्यान स्थापित करण्यात आले आहे, ज्यामुळे या परिसराच्या सौंदर्यात आणि पर्यटन मूल्यात मोठी भर पडली आहे.
राधानगरी येथील वन्यजीव विभागीय कार्यालयाच्या पुढाकाराने प्रस्थापित झालेले हे फुलपाखरू उद्यान, निसर्गप्रेमींसाठी एक कुतूहलाचे आणि आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. या उद्यानात अनेक प्रकारचे, असंख्य आणि अत्यंत आकर्षक फुलपाखरे कायमस्वरूपी आढळून येतात. यामागील मुख्य कारण म्हणजे, वन विभागाने फुलपाखरांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी विशिष्ट फुलझाडे आणि त्यांना अनुकूल असे नैसर्गिक वातावरण येथे तयार केले आहे. यामुळे फुलपाखरांसाठी योग्य अन्नसाखळी आणि राहण्यासाठी पोषक ठिकाण उपलब्ध झाले असून, त्यांची उत्पत्ती येथे सतत होत राहते.
या फुलपाखरू उद्यानाला भेट देण्यासाठी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. निसर्गाच्या या चमत्कृतीमुळे हे उद्यान पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे चमकू लागले आहे.सध्याच्या वनक्षेत्रपाल वन्यजीव, राधानगरीच्या अधिकारी पल्लवी डी. चव्हाण आणि वनपाल बर्गे यांच्यासह त्यांचे सर्व शासकीय व इतर कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नातून हे उद्यान आज नाव रूपाला आले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे फुलपाखरांचे हे नयनरम्य जग जतन आणि संवर्धित झाले आहे.
येथील पर्यटकांकडून ‘हे आकर्षक फुलपाखरू उद्यान सर्वांनी अवश्य पहावे’ असे आवाहन केले जात आहे. राधानगरी अभयारण्याच्या समृद्ध वारश्यात या फुलपाखरू उद्यानाची भर पडल्याने, महाराष्ट्राच्या वन्यजीव पर्यटनाला एक नवा आयाम मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button