राधानगरी पोलिसांची मोठी कामगिरी! २.५० लाखांच्या १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त; एका आरोपीला अटक!

राधानगरी (सलीम शेख): कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका आरोपीकडून तब्बल ₹ २,५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार रुपये) किमतीच्या १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे (वय ३६, रा. नरतवडे, ता. राधानगरी) याच्याकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची खात्रीशीर माहिती वाहतूक पोलीस अंमलदार रणधीर वरोटे यांना मिळाली होती. माहितीची गंभीरता लक्षात घेऊन, पोलीस अंमलदार वरोटे यांनी तात्काळ सदर माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्याकडे दिली. निरीक्षक गोरे यांनी कोणतीही वेळ न घालवता त्वरित तपास पथक नेमून आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले.
तपास पथकाने तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण चौकशीचा आधार घेत आरोपी विनायक कांबळे याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरलेल्या एकूण १३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. आरोपी विनायक कांबळे याने या सर्व गाड्या कोल्हापूर शहरातील विविध भागांतून चोरल्याची कबुली दिली आहे. या मोटारसायकल चोरीप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ०४ आणि शाहुपुरी पोलीस ठाण्यात ०४ असे एकूण ०८ गुन्हे नोंद आहेत. उर्वरित ०५ मोटारसायकलींची नोंदणी (रजिस्ट्रेशन) माहिती अपूर्ण आहे. या गाड्यांच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम पोलीस युद्धपातळीवर करत आहेत.
तुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या पथकात सहा. फौजदार पारळे, पोहेकॉ खामकर, पोहेकॉ शेळके, पो शि वरोटे, पो शि पोवार, पोशि पाटील, पोशि गुरव, पो शि किरण पाटील, पो शि भोपळे, पोशि बरगे, आणि चालक गुरव यांचा समावेश होता. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक योगश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक बी. धिरजकुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ज्या नागरिकांच्या मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत, त्यांना राधानगरी पोलिसांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. चोरीला गेलेल्या वाहनांच्या चेसीस (Chassis) आणि इंजिन क्रमांकाची खात्री करण्यासाठी नागरिकांनी त्वरित राधानगरी पोलीस ठाणे किंवा पोलीस निरीक्षक संतोष गोरे (मो. ८९७५५०५९००) यांच्याशी संपर्क साधावा.




