शिरोळ: तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी रस्ता रुंदीकरणासह ३० फुटी होणार!
अखेर २५ वर्षांच्या मागणीला संघटित प्रयत्नांमुळे न्याय - दिगंबर सकट

शिरोळ (प्रतिनिधी : बाळासो कांबळे): शिरोळ येथील तहसील कचेरी ते दत्त कारखाना मार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी समता नगरसह परिसरातील नागरिकांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शिरोळ नगरपालिकेला जाग आली आहे. नागरिकांची तब्बल २५ वर्षांपासूनची असलेली मागणी अखेर पूर्णत्वास जाणार असून, तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी पर्यंतचा रस्ता ३० फूट रुंदीकरणासह लवकरच करण्यात येणार आहे.
शिरोळ मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भात लेखी आश्वासन दिले असल्याची माहिती समता नगर जनहित मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर सकट यांनी एका पत्रकाद्वारे दिली. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीची आणि रुंदीकरणाची मागणी प्रलंबित होती. सध्या हा रस्ता इतका खराब झाला आहे की, सामान्य नागरिकाला चालत जाणेही मुश्किल झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरवस्था यामुळे नागरिक त्रस्त होते.
या प्रश्नात समता नगर जनहित मंडळाने पुढाकार घेतला. समता नगर, साईनगर, बेघर वसाहत, इंदिरानगर, रमाबाई नगर या भागातील नागरिकांच्या निवेदनांसह मंडळाने वेळोवेळी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, दिनांक १०/११/२०२५ रोजी शिष्टमंडळाने थेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आंदोलनाची नोटीस दिली. नागरिकांचा वाढता दबाव आणि आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या शिष्टमंडळात दिगंबर सकट, अशोक कांबळे, दिनकर मोरे भाट, रियाज मोमीन टेलर, सहदेव कांबळे, भाऊसो कदम गुरुजी, आनंद सकट, सचेतन बनसोडे, सौरभ घाडगे, जालंदर वराळे, सलाउद्दीन तहसीलदार, समीर मताबे आदींचा समावेश होता. चर्चेदरम्यान, प्रशासनाने हा रस्ता आता नगरपालिकेने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. मुख्याधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला लेखी आश्वासन दिले की, आचारसंहिता संपताच तहसील कचेरी ते बेंद्रे दूध डेअरी पर्यंतचा रस्ता लवकरात लवकर अतिक्रमण निर्मूलनासह ३० फूट रुंद केला जाईल.
नागरिकांच्या संघटित प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर प्रशासनाला कामाची गती घ्यावी लागली. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता, हे आश्वासन पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिगंबर सकट यांनी यावेळी दिला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून, नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ होणार आहे.




