वडगावमध्ये विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक! रिक्षातून २.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल!

वडगाव (हातकणंगले): (प्रतिनिधी/सलीम शेख) : वडगाव (ता. हातकणंगले) पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना आणि अवैध मार्गाने विदेशी दारूचा मोठा साठा बाळगून त्याची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹२,४२,७६०/- किमतीची विदेशी दारू जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजण्याच्या सुमारास वडगाव ते हातकणंगले रस्त्यावरील शिवनेरी धाबा या परिसरात ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. पोलीस तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, एका रिक्षातून (क्रमांक एमएच-०९-ईएल-४२५४) मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा विनापरवाना नेला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सदर रिक्षा ताब्यात घेतली.
रिक्षाची तपासणी केली असता, त्यात विविध नामांकित कंपन्यांच्या विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. तपास पथकाने एकूण ₹२,४२,७६०/- किमतीचा विदेशी दारूचा हा सर्व साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी अनिल नाईक यांच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारू बाळगण्याचा अथवा त्याची वाहतूक करण्याचा कोणताही वैध परवाना आरोपीकडे नव्हता, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक आणि विक्री करण्याच्या अवैध कृत्यांवर वडगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. बेकायदेशीर दारू वाहतुकीच्या स्रोतांचा आणि यामागे असलेल्या व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत.




